Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

राज्यात 'या' तारखेपासून बरसणार पावसाच्या सरी; हवामान विभागाचा अंदाज

IMD Report | मुंबईमध्ये येत्या 6 जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. वेळेआधीच मुंबईत मान्सूनच्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 

राज्यात 'या' तारखेपासून बरसणार पावसाच्या सरी; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : मुंबईमध्ये येत्या 6 जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. वेळेआधीच मुंबईत मान्सूनच्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या 1 जूनला केरळमध्ये, तर 6 जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होईल असं भाकित हवामान विभागानं वर्तवलंय.

उष्णतेच्या लाटेचाही इशारा

दरम्यान येत्या 3 ते 4 दिवसांत दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं हा इशारा दिला आहे.

मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद, कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्याला पावसानं झोडपलं

लातूर जिल्ह्याला काल संध्याकाळी पावसानं चांगलंच झोडपलं. निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजानी, हालसी, तुगाव, तगरखेडा, हलगरा, सावरी गावामध्ये वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. 

औराद, तगरखेडा, हालसी या रस्त्यावर झाडं उन्मळून पडली तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. त्यामुळे रस्ते वाहतूक बंद होती. तगरखेडा, हालसी गावांना विद्युत पुरवठा करणारे विजेचे खांब जमीनदोस्त झालेत. अनेक ठिकाणी तारा तुटल्याने या भागातील गावांचा वीजपुरवठा खंडित झालाय.

या पावसामुळे भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी आंब्याच्या बागेचं नुकसान झालंय. या भागात केशर आंबा बागेचं मोठं क्षेत्र आहे. विक्रीला तयार असणारा आंबा ह्या वादळी पावसाच्या तडाख्यात सापडलाय. प्रशासनानं पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय.

Read More