Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

आभासी करन्सी जप्त कशी करणार? पोलिसांसमोर प्रश्न

बिटकॉईन फसवणुकीचा पुण्यातला पहिला गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी निशा रायसोनी यांनी तक्रार दाखल केलीय. आकाश संचेती नावाच्या तरूणाला पोलिसांनी अटक केलीय. 

आभासी करन्सी जप्त कशी करणार? पोलिसांसमोर प्रश्न

नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : बिटकॉईन फसवणुकीचा पुण्यातला पहिला गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी निशा रायसोनी यांनी तक्रार दाखल केलीय. आकाश संचेती नावाच्या तरूणाला पोलिसांनी अटक केलीय. 

क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक 

निशा रायसोनी नावाच्या व्यावसायिक महिलेने आकाश संचेती या युवकाकडे १३ लाख रूपये गुंतवले होते. हे पैसे संचेती 'बिटकॉईन'मध्ये गुंतवणार होता. प्रत्यक्षात त्याने हे पैसे 'एमकॉप' या दुसऱ्या क्रिप्टो करन्सीत गुंतवले. त्यात त्याचं नुकसान झालं. त्यामुळे तो पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. मुद्दलाचे पैसेही परत मिळणार नाहीत हे लक्षात आल्यावर रायसोनी यांनी तक्रार दाखल केली. रायसोनी यांच्यानंतर आणखी तीन गुंतवणूकदारांनी आकाशविरोधात तक्रार केली. त्यामुळे फसवणुकीची रक्कम ४२ लाखांवर पोहोचलीय.

पोलिसांसमोर आव्हान

या गुन्ह्यात पोलिसांसमोर आव्हान आहे ते वेगळंच आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात मुद्देमाल म्हणून, ट्रेझर जप्त केलंय. ट्रेझर हे अगदी पेन ड्राइव्ह सारखे असते. या ट्रेझरमध्ये इ वॉलेट असतात.  आकाश संचेतीच्या या ट्रेझरमध्ये २५ बिटकॉइन आणि ७९ इथेलियम ही क्रिप्टो करन्सी आहे. त्याचं आजचं बाजारमूल्य तब्ब्ल दोन कोटी ७४ लाख रुपये आहे. पण पोलिसांना ते जप्त करता येईना. कारण ही सर्व आभासी करन्सी आहे. ती जप्त कशी करायची, त्याची प्रोसेस काय हेच पोलिसांना माहित नाही. आता ही क्रिप्टो करन्सी जप्त करण्यासाठी पोलिसांनी कोर्टाकडे परवानगी मागितली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल पाटील यांनी दिली.

गुंतवणुकदारांचे डोळे उघडणार?

कोर्टाने २० जानेवारीपर्यंत संचेतीला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचे इतरही साथीदार असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे क्रिप्टो करन्सीच्या नावे देशात हजारो कोटींची फसवणूक करणारा अमित भारद्वाजही यात सहभागी आहे. त्याच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे... मोठ्या परताव्याच्या आमिषाने क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा गुन्हा डोळे उघडणारा ठरावा. 

Read More