Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

नवरा बायकोच्या भांडणात गेला सासूचा जीव; शेळी बांधायच्या खुंट्याने केली निर्घृण हत्या

Hingoli Crime : या प्रकारानंतर हिंगोलीत खळबळ उडाली आहे. शेळी बांधायच्या खुंट्याने जावयाने सासूला संपवत तिथून पळ काढला होता. पोलिसांनी आरोपी जावयाला तपासानंतर ताब्यात घेतली असून त्याची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु केली आहे.

नवरा बायकोच्या भांडणात गेला सासूचा जीव; शेळी बांधायच्या खुंट्याने केली निर्घृण हत्या

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : शुल्लक कारणावरुन जावयाने सासूची हत्या (Son in law killed mother in law) केल्याचा प्रकार हिंगोलीमध्ये (Hingoli Crime) घडला आहे. जेवण वाढण्याचा वाद इतका टोकाला गेला की जावयाने शेळी बांधायच्या खुंट्याने सासूची निर्घृण हत्या केली आहे. सासूची हत्या केल्यानंतर जावयाने लहानग्या मुलीलासुद्धा मारहाण केल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.  हत्येनंतर आरोपीने तिथून पळ काढला होता. तपासानंतर पोलिसांनी आरोपी जावयाला कुर्तडी शिवारातून अटक केली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. जेवण वाढण्याच्या कारणातून जावयाने सासूला ठार केले आहे. पत्नीसोबत भांडण सुरू असताना सासूही घालून पाडून बोलत असल्याने दारुच्या नशेत असलेल्या जावयाने सासूला संपवलं. शेळ्या बांधायचा खुंटा उपटून सासूच्या डोक्यात घातला. या घटनेत सासूचा मृत्यू झाला. लताबाई नागराव खिल्लारे (50) असे मृत सासूचे नाव असून अजय सोनावणे असे आरोपीचे नाव आहे.

अजय सोनावणे हा त्याच्या पत्नीसोबत सासू लताबाई नागराव खिल्लारे यांच्याकडेच राहत होता. सासूरवाडीत राहत असलेला अजय सोनावणे बाळापूरच्या बाजारपेठेत हमालीचे काम करून उपजीविका करत होता. रविवारी दुपारी जेवण वाढण्याच्या कारणावरुन अजयचा पत्नीसोबत वाद झाला. या वादात लताबाई यांनी मुलीची बाजू घेत अजयला घालून पाडून बोलत राग व्यक्त करण्यास सुरुवात केली. राग अनावर झाल्याने संतापाच्या भरात अजयने शेळी बांधण्यासाठी रोवलेला खुटा उपटने थेट सासूच्या डोक्यात घातला. अजयने इतक्या जोरात हल्ला केला लताबाई गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. यासोबत अजयने पत्नी आणि मुलीलासुद्धा मारहाण केली. या घटनेनंतर अजयने तिथून पळ काढला. 

शेजारच्यांनी आरडाओरडा ऐकून लताबाई यांच्या घराकडे धाव घेतली. घरातील प्रकार पाहून त्यांना धक्का बसला. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. आखाडा बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना  उपचारासाठी आखाडा बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यांना नांदेड येथे हलवण्यात आले. तर आरोपी अजयच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले. तपासानंतर कुर्तडी फाटा शिवारातून पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

Read More