Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

महाराष्ट्रात धुवांधार! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, महाडमध्ये पूरस्थिती; साताऱ्यात कोसळली दरड

Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. कोकणाला पावसाने झोपडले आहे. तर, पुण्यासह विदर्भातही पावसाने धुमाकुळ घातला आहे. 

महाराष्ट्रात धुवांधार! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, महाडमध्ये पूरस्थिती; साताऱ्यात कोसळली दरड

Maharashtra Rain Update:  गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने मुंबईसह कोकणाला झोडपले आहे. महाड, रायगडमध्ये मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाले आहे. तर, रायगडमध्ये आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. प्रशासनाकडून नागरिकांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

महाडमध्ये पूरसदृश्य परिस्थीती 

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने महाड शहर आणि परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. महाड शहराच्या सखल भागात, रस्त्यावर पाणी साचले आहे. शहराच्या जवळून वाहणाऱ्या सावित्री काळ, गांधारी या तीनही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. मात्र पाणी पातळी वाढण्याचा वेग कमी असल्याने जनजीवनावर फारसा परिणाम दिसून येत नाही. महाड शहरात पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. महाड बाजारपेठेत शिरले पुराचे पाणी त्यामुळं व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं प्रशासनाने नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार दिवसात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

आंबेनळी घाटात दरड कोसळली

साताऱ्यातील आंबोनळी घाटात आणखी एक दरड कोसळली आहे. दाबिल टोक या ठिकाणी ही दरड कोसळली आहे. मोठं मोठी दरड रस्त्यावर आल्याने वाहतुकीला फटका बसला आहे. याआधी रात्री चिरेखिंडी येथे दरड कोसळली होती. 

रायगडमध्ये मुसळधार पाऊस 

रायगडमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पाताळगंगा, अंबा, कुंडलिका आणि सावित्री या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. सध्या भरतीची वेळ असल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, रायगडमध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

अलिबाग बायपास रोडवर पाणी

अलिबाग शहर आणि परिसराला मुसळधार पावसाने झोडपले असून रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. शहराच्या वेशीवर असलेल्या बायपास रोडवर गुडघाभर पाणी साचले असून त्यातून वाट काढताना नागरिक आणि वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते आहे.

लोणावळ्यात विक्रमी पाऊस

लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी पाऊस कोसळला आहे. गेल्या 24 तासांत लोणावळ्यात तब्बल 220 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर 48 तासांत तब्बल 434 मिमी पाऊस कोसळला आहे. असं असलं तरी यंदा आत्तापर्यंत झालेला पाऊस हा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2592 मिमी पाऊस बरसला होता. यंदा मात्र केवळ 1744 मिमी इतकाच पाऊस कोसळला आहे.

 

Read More