Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

फरार नीरव मोदीच्या अलिबागमधील बंगल्यावर कारवाई होणार

अलिबागमधील बंगल्यावर होणार कारवाई

फरार नीरव मोदीच्या अलिबागमधील बंगल्यावर कारवाई होणार

अलिबाग : बँकांचे हजारो कोटींचं कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या नीरव मोदीच्या अलिबाग इथल्या बंगल्यावर कारवाई करण्यात येणार आहे. अलिबागच्या किहीम समुद्रकिनारी त्याचा ३० हजार चौरस फुटांचा अनधिकृत बंगला आहे. या बंगल्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. हा बंगला अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात होता. अंमलबजावणी संचालनायलायनं या बंगल्याचा ताबा रायगड जिल्हा प्रशासनाकडे दिला आहे.

याआधी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हायकोर्टाकडे अर्ज केला होता की, या बंगल्यावर कारवाई करु नये. त्यानंतर हायकोर्टाने 'ईडी'ला चांगलंच सुनावलं होतं. नीरव मोदीचा अनधिकृत बंगला जमीनदोस्त का करत नाही. बंगल्यावरील कारवाईवर 'ईडी'ला स्थगिती का हवी आहे अशा शब्दात कोर्टाने ईडीला सुनावलं होतं. यासंदर्भात महिनाभरात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देखील दिले होते.

अलिबाग किनारी जमीन विकत घेऊन अनेकांनी येथे बंगले बांधले आहेत. यामध्ये नीरव मोदीचा देखील समावेश आहे. सीआरझेड कायद्याचं उल्लंघन करुन हे बंगले बांधण्यात आले आहेत. वर्सोली, सासवणे, कोलगाव, डोकवडे या गावांमध्ये अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहेत. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी याआधी नीरव मोदीच्या बंगल्याविरोधात कारवाईची नोटीस काढली होती. पण सीबीआयने हा बंगला सील केला होता. त्यानंतर 'ईडी'ने चौकशीसाठी तो ताब्यात घेतला होता. अशी माहिती वकिलांनी याआधी कोर्टात दिली होती.

Read More