Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कोकणात भयानक पाऊस ! रत्नागिरीमध्ये NDRF ची टीम दाखल; 177 नागरिकांचे स्थलांतर

रत्नागिरीत जोरदार पाऊस कोसळत असून, खेड शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. NDRFकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. 

कोकणात भयानक पाऊस ! रत्नागिरीमध्ये  NDRF ची टीम दाखल; 177 नागरिकांचे स्थलांतर

Kokan Rain Update :  कोकणात पावसाने थैमान घातले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे  रायगड, महाड, खेड, चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यातुन   NDRF ची टीम रत्नागिरीमध्ये  दाखल झाली आहे. 177 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. 

महाड शहरात पुराचे पाणी शिरायला सुरुवात

रायगडमधील महाडच्या गांधारी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे महाड शहरात पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. महाड शहरातील रायगड रस्त्यावर पुराचे पाणी आलंय. दरम्यान NDRFच्या जवानांनी महाडमधील पूर परिस्थितीची पाहणी केली आहे. तर शहरातील सखल भागांत राहणा-या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. खेड शहरातील 177 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. 

रत्नागिरीत जोरदार पाऊस कोसळत असून, खेड शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. इथल्या पोत्रिक मोहल्ला भागात नागरिक अडकले आहेत. तर NDRFकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. तर पुण्यातूनही NDRFची आणखी एक टीम या ठिकाणी दाखल होणार आहे. सध्या NDRFची प्रत्येकी एक टीम सध्या चिपळूण आणि खेडमध्ये आहे. तर जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 

तुळशी खिंड घाटात दरड कोसळण्याची भिती

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये तुफान पाऊस सुरूये. जोरदार पावसामुळे तुळशी खिंड घाटात दरड कोसळण्याची भिती निर्माण झालीये. संपूर्ण घाट रस्त्यावरून माती मिश्रीत लाल पाणी वाहतंय. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. डोंगरातून पाणी रस्त्यावर येत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे महाड तुळशी खिंड मार्गे खेडकडे प्रवास करणा-या प्रवाशांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.

मुंबई- गोवा महामार्गावर पाणीच पाणी 

रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्येही सध्या जोरदार पाऊस पडतोय. यामुळं आता मुंबई- गोवा महामार्गावर पाणीच पाणी झालंय. मुंबई गोवा महामार्गावरील एक लेन पूर्णपणे पाण्यात गेलीय. पाऊस असाच सुरू राहिला तर महामार्गावर अजून पाणी येण्याची शक्यता आहे. चिपळूणच्या विविध सखल भागातही पाणी साचू लागलंय. चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस सुरूय. यामुळं डोंगरावरून येणाऱ्या पाण्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर सध्या पाणीच पाणी बघायला मिळतंय.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पावसाचा आज रेड अलर्ट 

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पावसाचा आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय...कोकणात आज काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय...रायगडमध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे...तर मुंबईतही आज जोरदार पावसाचा अंदाज असून,सकाळपासूनच मुंबईत पाऊस कोसळतोय...तर ठाण्यात आजसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय...पालघरमध्ये यलो अलर्ट जारी केला असून, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय...

Read More