Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

औषधांची विक्री वाढवण्यासाठी... फॉरेन टूरवर डॉक्टरांना महिलांची सोबत

'डॉक्टरांच्या नजरेतही मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह एखाद्या सेल्समनप्रमाणेच उरलेत'

औषधांची विक्री वाढवण्यासाठी... फॉरेन टूरवर डॉक्टरांना महिलांची सोबत

अरुण मेहेत्रे, झी २४ तास, पुणे : औषधांची विक्री वाढवण्यासाठी औषध निर्मिती कंपन्या आणि काही डॉक्टर्स किती खालच्या स्तराला जाऊ शकतात याचं धक्कादायक उदाहरण एका अहवालातून समोर आलंय. डॉक्टर्सना फॉरेन ट्रिप वर पाठवण्याबरोबरच त्यांच्यासोबत मनोरंजनासाठी टॉलीवूड अभिनेत्री उपलब्ध करून देण्यात आल्याचा प्रकार 'साथी' या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणातून उघडकीस आलाय. वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्ती जगासमोर याव्यात या दृष्टिकोनातून 'साथी'च्या टीमनं हा अभ्यास केलाय. वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिक नैतिकता, रुग्णांचे हक्क या विषयांवर 'साथी' कार्यरत आहे.

'साथी'चे विश्वस्त डॉक्टर अरुण गद्रे आणि अर्चना दिवटे यांनी हा धक्कादायक प्रकार उघड केलाय. ३६ एमआर आणि ६ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून हा अहवाल तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. औषधांची विक्री वाढवण्यासाठी कंपन्यांकडून डॉक्टरांना विविध प्रलोभनं दाखवली जातात, असंही त्यांनी आपल्या अहवालातून उघड केलंय. धक्कादायक म्हणजे, डॉक्टरांना महिलांचं अमिषही दाखवलं जातं किंवा डॉक्टरांकडूनच भेटवस्तूंची तसंच महिलांची मागणी केली जाते, असंही या अहवालात म्हटलं गेलंय.

'मेडिकल कॉऊन्सिल ऑफ इंडिया'नं कॉन्फरन्ससाठी चेकनं पैसे घेणं बंद केलेलं असतानाही या ना त्या मार्गानं (कॉन्फरन्सच्या बाहेरचं स्टॉलचं भाडं) हे पैसे दिले जातात. अतिशय महागड्या ठिकाणी या कॉन्फरन्स होतात. स्पॉन्सरशिपशिवाय हे शक्य नाही, असं डॉक्टर अरुण गद्रे यांनी 'झी २४ तास'शी बोलताना म्हटलंय. 

एकेकाळी मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्हला (एमआर) मान आणि दर्जा होता. परंतु, आता मात्र चांगल्या डॉक्टरांच्या नजरेतही मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह एखाद्या सेल्समनप्रमाणेच उरलेत. पूर्वी एमआर होण्यासाठी सायन्स ग्रॅज्युएट असणं आवश्यक होतं. परंतु, आता मात्र बारावी पास मुलांनाही एमआर म्हणून घेतलं जातं. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, चांगला बिझनेस देणाऱ्या मुंबईच्या दोन - तीन न्युरोलॉजिस्टना औषध कंपन्यांकडून फॉरेन टूरसहीत टॉलिवूड अभिनेत्री उपलब्ध करून दिल्या गेल्या, अशी धक्कादायक माहितीही गद्रे यांनी 'झी २४ तास'शी बोलताना उघड केलीय. 

'ही आम्ही कधीच अपेक्षा केली नव्हती. हे माहीत झाल्यानंतर शरमेनं आमची मान खाली गेली' असं म्हणतानाच डॉ. गद्रे यांनी मेडिकल क्षेत्रातील अशा अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची मागणी केलीय. 

Read More