Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'वर्षा नाईट क्लब'च्या कारस्थानाला कंटाळलो, भाजप माजी आमदार राष्ट्रवादीत

 भाजपला रामराम करत अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. 

'वर्षा नाईट क्लब'च्या कारस्थानाला कंटाळलो, भाजप माजी आमदार राष्ट्रवादीत

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावरील नाईट क्लबच्या सदस्यांमुळे भाजपाला वाईट दिवस असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. वर्षा बंगल्यावर रात्री १० वाजेपर्यंत गिरीश महाजन, जयकुमार रावल, प्रसाद लाड, प्रविण दरेकर आणि राम कदम साऱ्या खुशमस्कऱ्यांनी जनाधार असलेल्या नेत्यांविरोधात कारस्थानं केली. त्यांच्याविरोध स्थानिक नेत्यांना ताकद दिली, आपल्याच पक्षातील नेत्यांविरुद्धची कागदपत्रे विरोधकांपर्यंत पोहोचविल्याचा घणाघाती आरोप गोटे यांनी केला. भाजपला रामराम करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. 

एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित, विनोद तावडे तसेच चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात कारस्थाने झाल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे. राजकीय प्रवासात मला अनेकजण भेटले पण कोणी स्वपक्षीयांविरोधात विरोधकांना दारुगोळा पोहोचवला नाही. राज्याचे प्रमुख असून इतकी कारस्थाने सुरु ठेवल्याने राज्यात भाजपवर ही वेळ आल्याचा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. भाजप हा गुंडयुक्त पक्ष झाल्याचेही ते म्हणाले. 

अनिल गोटे यांना तिकिट न दिल्याने उद्विग्न होऊन त्यांनी ही प्रतिक्रिया दिल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. यावरही गोटे यांनी खुलासा केला आहे. मी पक्षाकडे तिकीटासाठी मागणी केलीच नव्हती. ८ एप्रीललाच मी माझ्या आमदार पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. अपमान अथवा अवहेलना सहन करुन भाजपा मधे रहाणारा मी लाचार नसल्याचे गोटे म्हणाले. 

माझ्या भानगडीत कुणी स्त्री लंपट रामाने कदम टाकू नये. मला संघ जनसंघ निष्ठा वगैरे शिकविण्याच्या नादात पडू नये असा टोला त्यांनी राम कदम यांना लगावला आहे. आपण पाळलेल्या पाळीव प्राण्यांना वेळीच लगाम घाला. माझ्याकडे गमविण्यासाठी प्राणांशिवाय काही नसल्याचे ते फडणवीस यांना उद्देशून म्हणाले.

Read More