Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

एकनाथ खडसेंना पुन्हा धक्का, एसीबीकडून मालमत्तेबाबत चौकशी

खसडे यांचा राजीनामा हा फडणवीस मंत्रिमंडळातील बिग विकेट म्हणून चर्चिला गेला.

एकनाथ खडसेंना पुन्हा धक्का, एसीबीकडून मालमत्तेबाबत चौकशी

नाशिक: भुखंड घोटाळ्याच्या आरोपावरून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले सत्ताधारी भाजपचे आमदार आणि तगडे नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. खडसे यांच्या मालमत्तेबाबत एसीबीने चौकशी केली आहे. या चौकशीसाठी खडसे एसीबी कार्यालयातही पोहोचल्याची सूत्रांची माहिती आहे. माजी मंत्री एकनाथ खड़सेंमागील चौकशीचा फेरा अजूनही सुरूच आहे. नाशिक एसीबीकडून एकनाथ खडसेंची चौकशी करण्यात आली.  खडसेंना एसीबीकडून मालमत्तेसंदर्भात विचारणा करण्यात आल्याचं समजतंय. अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी खडसेंची चौकशी केल्याचं समजतंय.

बेहिशोबी मालमत्ता 

खडसे यांनी स्वतःच्या व कुटुंबीयांच्या नावानं प्रचंड प्रमाणात माया जमवलीय. यासाठी त्यांनी आपल्या पदाचा व राजकीय वजनाचा वापर करून शेकडो-हजारो कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत, असा आरोप याआधीही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला होता. एकनाथ खडसे यांनी स्वतःच्या तसेच पत्नी मंदाकिनी, सून रक्षा, मुलगी शारदा चौधरी, जावई गिरीश चौधरी, मुलगी रोहिणी खेवलकर व जावई प्रांजल खेवलकर यांच्या नावानं नाशिक, जळगाव, धुळे, पुणे या ठिकाणी अनेक जमिनी, भूखंड व फ्लॅट खरेदी केलेले आहेत.

खडसे व त्यांच्या सर्व कुटुबीयांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न कमी दाखवले जात असतानाही त्यांच्या नावे खूप मोठ्या प्रमाणात स्थावर व जंगम मालमत्ता आहेत. खडसे यांनी आपण शेतकरी आहोत आणि आपले उत्पन्नाचे तेवढेच साधन आहे, असे विविध सरकारी नोंदींवर म्हटलेले असताना प्रत्यक्षात उत्पन्नाहून खूप मोठ्या प्रमाणात बिगरशेती जमिनी व भूखंड खरेदी केलेले आहेत. त्यांनी अनेक बेनामी व्यवहार करत स्वतःच्या व कुटुंबीयांच्या नावे मुक्ताई नगरमध्ये ३९ भूखंड, कोठाळी-मुक्ताई नगरमध्ये पाच भूखंड, पिंपरी-मुक्ताईनगर येथे पाच, घोडसगावमध्ये दोन भूखंड तसेच नाशिक, धुळे व पुण्यात काही भूखंड खरेदी केले आहेत. अनेक भूखंडांचे आरक्षण बदलून घेऊन ते लाटले आहेत, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. 

भाजपमधली 'बिग विकेट'

एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ आणि तितकेच निष्ठावान नेते म्हणून ओळखले जातात. कार्यकर्ता ते नेता आणि नेता ते मंत्री असा प्रदीर्घ अनुभव असलेल्या खडसे यांचे भाजपमध्ये मोठे प्रस्थ आहे. ज्येष्ठता, अनुभव आणि कार्यकर्त्यांची पसंती या गोष्टीचा विराचर करता खडसे हे नाव भाजपच्या गोटात नेहमीच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून आघाडीवर राहिले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर एकनाथ खडसे यांनाच मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल अशी राजकीय वर्तुळातही चर्चा असायची. मात्र, पक्षाने ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे केले आणि खडसे यांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली. त्यामुळे खडसे नाराज असल्याची चर्चा नेहमीच रंगलेली असते. खडसेंना महसुलमंत्री पद आणि इतर मंत्रालयाचा कारभार देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला खरा. पण, नव्याने सत्तेवर आलेल्या भाजपची सत्तेची नवलाई उतरण्याआधीच भूखंड घोटाळ्याचे प्रकरण पुढे आले आणि खडसे यांची विकेट गेली. खसडे यांचा राजीनामा हा फडणवीस मंत्रिमंडळातील बिग विकेट म्हणून चर्चिला गेला. आता एसीबीने पुन्हा एकदा त्यांची चौकशी केली आहे. त्यामुळे खडसे यांचे भवितव्य कसे असेल याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. 

Read More