Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

जळगाव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती

सलग चौथ्या वर्षी शेतकरी दुष्काळानं होरपळून निघाला

जळगाव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती

विकास भदाणे, जळगाव : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळाची सर्वाधिक तीव्रता आहे. अमळनेर तालुक्यातील शेतकरी तर सलग चौथ्या वर्षी दुष्काळानं होरपळून निघालाय.

अमळनेर हा दरवर्षी जेमतेम पर्जन्यमान असणारा अवर्षण प्रवण तालुका. तापी काठावरची निवडक गावं सोडली तर तालुक्यातली शंभर टक्के शेती निसर्गावर अवलंबून आहे. मग निसर्ग रुसला की इथल्या शेतकऱ्यांचं आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडणारंच. गेली चार वर्ष नेमकं तेच घडतंय. मंगरुळ गावातल्या भीमराव पाटील यांनी चार एकरावर कापसाची लागवड केली. 

निसर्गानं साथ दिली असती तर त्यांना एकरी १० क्विंटल उत्पन्नाची अपेक्षा होती. परंतु पावसाअभावी दुष्काळ पडल्यानं चार एकरातून अवघ्या एक-दीड क्विंटल उत्पादनावर समाधान मानावं लागणारेय. अन्य पिकांचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. 

भिकन पाटील या शेतकऱ्यानंही ८ एकरावर कापसाच्या १४ पिशव्यांची लागवड केली होती. जिरायती क्षेत्र असल्यानं त्यांनाही एकरी ७ क्विंटल कापसाच्या उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र एकरी अवघी ५० किलोंचं तुटपुंजं उत्पादन झालं आहे.

अमळनेर तालुक्यातून तापी, बोरी या नद्या वाहतात तर पांझरा नदीचाही सिंचनासाठी फायदा घेता येऊ शकतो. परंतु राजकीय इच्छाशक्तीचा अभाव सर्वपक्षीय नेत्यांमध्ये दिसून येतो. अमळनेर तालुक्याला शाश्वत सिंचनाच्या सोयी न मिळाल्यास इथला शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही हेच ढळढळीत वास्तव आहे. 

Read More