Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

जायकवाडी धरणाचं विदारक रूप; जलसमाधी मिळालेली गावं, मंदिरं दिसू लागली

अर्ध्या मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाने आता तळ गाठलाय.. धरणात अवघा 5 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे.. त्यामुळे धरणाच्या पोटात सामावलेली कित्येक गावं, भग्नावशेष आणि जुनी मंदिरं आता दिसू लागलीत.. 

जायकवाडी धरणाचं विदारक रूप; जलसमाधी मिळालेली गावं, मंदिरं दिसू लागली

Drought in Marathwada : भेगाळलेली जमीन, भग्न झालेले घरांचे अवशेष, पाण्याअभावी मासे  मरून पडलेl.  हे विदारक दृश्य आहे मराठवाड्याचं जीवन असलेल्या जायकवाडी धरणातलं. जायकवाडी धरणाचं हे बोडकं रुप धडकी भरवणारं आहे. जायकवाडी धरणानं यंदा तळ गाठलाय.  धरणात अवघं 5 टक्के पाणी शिल्लक आहे.. 7 वर्षांनी धरणाची ही अवस्था झाली.. त्यामुळे मराठवाड्यातील तब्बल 500 गावं आणि हजारो हेक्टरवरील शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय.   

जायकवाडी धरणाने तळ गाठल्याने धरणामध्ये सामावलेली 23 पेक्षा अधिक गावं, जुनं चक्रधर स्वामी आणि महादेवाचं मंदिर, एक दर्गा दिसू लागलेत... जवळपास सात वर्षांनंतर ही अवस्था झालीय. एरव्ही पाण्याखाली असलेली जुनी मंदिरं आणि दर्गा दिसू लागल्याने भाविकही दर्शनासाठी येऊ लागलेत. 

मराठवाड्यातील जनतेला जायकवाडीचं हे ओसाड रुप पाहवत नाहीय.. त्यांचे डोळे आता चातकासारखे ढगांकडे लागलेत. लवकरच चांगला पाऊस व्हावा आणि पुन्हा एकदा जायकवाडी धरणात लाटांची शर्यत पाहायला मिळावी एवढीच त्यांना आशा आहे..

मराठवाड्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालीय, हजारो टँकर मराठवाड्याच्या रस्त्यावर फिरताना दिसतायत. छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यात सावरखेडा-ब पांढरी गावात एक हंडा पाण्यासाठी सुमारे 300 फूट खोल दरीत उतरावं लागतंय.. छोट्याशा झ-यातून पाणी आणावं लागतंय. इतकंच काय तर हंडाभर पाण्यासाठी दोनदोन तास लाईन लावावी लागतीय. 43 डिग्री तापमानात जीवघेणी कसरत केल्यावर अवघं हंडाभर पाणी मिळतंय. अनेक जण या दरीत पडून जखमी झालेत.

वाशिम जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झालीय. 55 गावांत पाण्याची समस्या निर्माण झाली. जिल्ह्यातील जलप्रकल्पात केवळ 16 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे शहराला 10 दिवसांआड पाणीपुरवठा केला जातोय. तर ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी 53 ठिकाणी विहिर अधिग्रहण करण्यात आल्यात... तर 2 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. मान्सूनचा पाऊस जर लांबणीवर पडला तर.... पाणीसमस्या आणखी भीषण होण्याची शक्यता आहे.

 

Read More