Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

रत्नागिरीत बाळंतिणीचा मृत्यू, पावसकर हॉस्पिटलचा परवाना निलंबित

प्रसुतीनंतर केवळ सहा दिवसात रत्नागिरीत बाळंतिणीचा मृत्यू झालाय. पदरात केवळ सहा दिवसांचे मुल असलेल्या या बाळंतीण मृत्यूप्रकरणी पावसकर हॉस्पिटलवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

रत्नागिरीत बाळंतिणीचा मृत्यू, पावसकर हॉस्पिटलचा परवाना निलंबित

रत्नागिरी : प्रसुतीनंतर केवळ सहा दिवसात रत्नागिरीत बाळंतिणीचा मृत्यू झालाय. पदरात केवळ सहा दिवसांचे मुल असलेल्या या बाळंतीण मृत्यूप्रकरणी पावसकर हॉस्पिटलवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

रुग्णालयात एकही डॉक्टर नाही!

बाळंतीण ज्ञानदा पोळेकर यांचा मृत्यू झाला. ज्ञानदा, आज या जगात नाही. पाच दिवसांपूर्वीच रत्नागिरी शहरातल्या पावसकर हॉस्पिटलमध्ये त्यांची सीझर डिलिव्हरी झाली होती. तीन दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र शनिवारी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना पुन्हा पावसकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र त्यावेळी तिथं एकही डॉक्टर उपस्थित नव्हता.

पावसकर दाम्पत्य शहराबाहेर

हे हॉस्पिटल चालवणारे पावसकर दाम्पत्य शहराबाहेर होते. तरीही ज्ञानदा यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले. मात्र पुढच्या आठ तासानंतरही त्यांना तपासायला एकही डॉक्टर आला नाही. त्यामुळे रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. 

हॉस्पिटलचा परवाना निलंबित

पावसकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणाविरोधात नागरिक आक्रमक झाल्यानंतर अखेर जिल्हा शल्य चिकित्सक प्रल्हाद देवकर यांनी पावसकर हॉस्पिटलची पाहणी केली. यावेळी इथं त्यांना अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत पावसकर हॉस्पिटलचा परवाना निलंबित करण्यात आलाय.  

आणखी एक प्रकरण

रत्नागिरी शहरात वैद्यकीय हलगर्जीपणाची अशी अनेक उदाहरणं गेल्या काही दिवसांत समोर आलीत. हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाला प्राण गमवावे लागल्याची ज्ञानदा यांची ही तिसरी घटना आहे. रत्नागिरीतील संदीप मुकादम यांच्याबाबतही असाच काहीसा प्रकार घडला. त्यांच्या पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र यांत त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालाय. या मृत्यूला डॉक्टराचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप संदीप यांनी केलाय. त्याविरोधातील पुराव्यासाठी कागदपत्रं जमवून ते संघर्ष करतायत. मात्र त्यांना कुणीही दाद देत नाही. 

नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण 

ज्ञानदा यांच्या मृत्यूनंतर पावसकर हॉस्पिटलकडून कोणताही खुलासा देण्यात आलेला नाही. त्यामुळे रत्नागिरी शहरातील अशा वैद्यकीय व्यवसायिकांच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. वैद्यकीय क्षेत्रातून लूट सुरु असल्याचा आरोप होतोय. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या ज्या समितीने यावर अंकुश ठेवायचा आहे ती समिती प्रभावीपणे काम करत नसल्याचाही आरोप होतोय. 

एकमेकांना सावरुन घेत व्यवसाय करण्याच्या वृत्तीत लाखो रुपये खर्च केल्यानंतरही सर्वसामान्यांचा जीव जातोय. याच हलगर्जीपणाचा बळी ज्ञानदा ठरल्या. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील अशा बेजबाबदार लूट प्रॅक्टिसविरोधात संतापाची भावना आहे. 

Read More