Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

प्रणिती शिंदेंना मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्याने रक्तानं लिहिलं हायकमांडला पत्र

प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज

प्रणिती शिंदेंना मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्याने रक्तानं लिहिलं हायकमांडला पत्र

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील एकमेव काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांच्या एका कार्यकर्त्यानं थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रक्तानं पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्या आहेत. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी अपेक्षा होती. मात्र शेवटच्या क्षणी त्यांचं नाव कट झालं.

महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी पार पडला. पण या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सगळ्याच पक्षातील अनेक आमदार मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहेत. महाविकासआघाडीने मंत्रिमंडळात तरुण नेत्यांना संधी दिली आहे. पण या यादीत काँग्रेसच्या युवा आमदार आणि माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांना वगळल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत.

काँग्रेसने अशोक चव्हाण, केसी पाडवी, विजय वडेट्टीवर, अमित देशमुख, सुनील केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. सतेज पाटील आणि डॉ. विश्वजित कदम यांना राज्यमंत्रिपद मिळालं आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ही नावं निश्चित केली. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी चर्चा होती. पण त्यांना संधी मिळाली नाही. दुसरीकडे सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची नाराज आमदारांची समजूत काढताना दमछाक होतांना दिसत आहे.

Read More