Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

केंद्राचे नवे कृषीकायदे राज्यात लागू होणार नाही, महाविकास आघाडी सरकारची भूमिका

केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या कृषीविधेयकांना राज्यातील शेतकऱ्यांचा विरोध होत आहे.  

केंद्राचे नवे कृषीकायदे राज्यात लागू होणार नाही, महाविकास आघाडी सरकारची भूमिका

मुंबई : केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या कृषीविधेयकांना राज्यातील शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. शेतकऱ्यांच्या सुरात आता राज्य सरकारनंही सूर मिसळला आहे. केंद्राचे नवे कृषीकायदे राज्यात लागूच होऊ देणार नाही, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषिविधेयकांविरोधात महाराष्ट्रातही संताप आहे. याच संतापाचा उद्रेक आज महाराष्ट्रात पाहायला मिळाला. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विधेयकाच्या प्रती जाळून निषेध केला. 

केंद्राचं शेतकरीप्रेम हे पुतना मावशीचं प्रेम असल्याची टीका त्यांनी केली. दुसरीकडे सरकारही केंद्राचे नवे कृषिकायदे राज्यात लागू करणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी आज ‘भारत बंद’चा नारा दिला होता. विविध शेतकरी संघटनांची अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशव्यापी संघटनांनी यात भाग घेतला. 

शेतकऱ्यांसाठी दहा आमदारक्या  सोडू - राजू शेट्टी

आपल्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यासाठी दहा आमदारक्या  सोडू, असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले. कांद्याचा मुद्दा घेत आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीय. शिरूर तालुक्यातल्या पंचतळे इथे केंद्र सरकारच्या निर्यात बंदीविरोधात आंदोलन केलं. गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या. केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. 

अमरावती । शेतकरी रस्त्यावर

केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत कृषी विधेयक बिल मंजूर केले हे बिल शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे शेकडो शेतकरी रस्त्यावर आलेयत. दोन तास अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलं.  नागपूर मुंबई महामार्ग अडवलेला. त्यामुळे महामार्गावर वांहनांच्या रांग लागल्या होत्या.

जालना । शेतकरी संघटनेने आंदोलन

जालन्यातील जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अर्धनग्न आंदोलन केलं. कृषी विधेयकाच्या  निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. कागदपत्र पेटवून देऊन होळी देखील केली. आंबा आणि डाळिंब या फळपिकांचा आंबिया बहाराचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणीही त्यांनी केली. 

जळगाव । लोकसंघर्ष मोर्चातर्फे रस्तारोको

संसदीय पद्धतीचा ऱ्हास करत देशातील शेतकरी आणि कामगार यांच्या विरोधात मोदी शासनाने पारित केलेली विधेयके तात्काळ रद्द करून शेतकरी व कामगार यांच्यावरील अन्याय दूर करण्यात यावा यासाठी आज जळगाव येथे लोकसंघर्ष मोर्चा तर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रस्ता रोको आंदोलनामुळे नागपूर मुंबई महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

परभणी । जोरदार निदर्शने

परभणीत डावे पक्ष आणि संघटनांच्यावतीने शेतकरी, कामगार विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. त्याआधी शहारातुन मोर्चा काढण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात हे आंदोलन पार पडलं. यावेळी शेतकरी आणि कारमागर विरोधी कायदे तात्काळ रद्द करण्यात याव्यात,अन्यथा पुढे होणाऱ्या परिणामांना सरकारच जबाबदार राहील असा इशारा ही डावे पक्ष आणि संघटनांकडून देण्यात आला. यावेळी शेकडो शेतकरी कामगार मजूर या मोर्चात सहभागी झाले होते.

Read More