Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा शिर्डीत राडा

भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिर्डीत राडा केला आहे. या कार्यकर्त्यांनी साई मंदिर आवारातील ड्रेसकोड विषयीच्या फलकांना काळं फासलं आहे. या प्रकरणी ३ महिला कार्यकर्त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा शिर्डीत राडा

शिर्डी : भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिर्डीत राडा केला आहे. या कार्यकर्त्यांनी साई मंदिर आवारातील ड्रेसकोड विषयीच्या फलकांना काळं फासलं आहे. या प्रकरणी ३ महिला कार्यकर्त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे यावर प्रतिक्रिया देताना भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी फलकांना काळं फासणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं आहे. तसेच लवकरात लवकर हे फलक काढावेत, नाहीतर काकड आरतीला पैसे घेण्याचा मुद्दा असो किंवा भक्तांना आध्यात्मिक शिक्षा देण्याचा प्रश्न असो किंवा ड्रेसकोडचा प्रश्न असो, यावर भूमाता ब्रिगेड आता आणखी आक्रमक होणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या विरुद्ध  देखील गुन्हा दाखल होऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. साई संस्थानच्या ड्रेसकोडला तृप्ती देसाई यांनी यापूर्वीच विरोध केला होता. तृप्ती देसाई यांनी याआधी ड्रेस कोडबाबतचे फलक हटवण्याची मागणी केली होती. अखेर गनिमी काव्यानं आज शिर्डीत भूमाता ब्रिगेडने आपलं आंदोलन केलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना एका महिन्यापूर्वी शिर्डीकडे येताना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं होतं. महिलांना साई मंदिरात प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या ड्रेसकोडला तृप्ती देसाई यांचा विरोध होता.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना यापूवी तेलंगणातील हैदराबादेत मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, म्हणून पोलिसांनी अटक केली होती. डॉक्टर तरूणीवर बलात्कार आणि तिच्या हत्येप्रकरणी तृप्ती देसाई आंदोलनाच्या पावित्र्यात होत्या.

शनि शिंगणापुरातील शनि मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासाठी तृप्ती देसाई यांनी आंदोलन केलं होतं. अखेर काही दिवसांनी महिलांना शनि शिंगणापुरातील मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय झाला होता.

Read More