Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'आम्ही आदेश देतोय की...', जेव्हा बाळासाहेबांनी पवारांना भरलेला दम; म्हणालेले, 'पक्षचिन्ह घड्याळ असलं तरी..'

Balasaheb Thackeray Letter To Sharad Pawar: शरद पवार यांना अगदी वडीलधाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हे पत्र लिहिल्याचा उल्लेख पत्रामध्येच आहे. हे पत्र सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्हायरल होत आहे.

'आम्ही आदेश देतोय की...', जेव्हा बाळासाहेबांनी पवारांना भरलेला दम; म्हणालेले, 'पक्षचिन्ह घड्याळ असलं तरी..'

Balasaheb Thackeray Letter To Sharad Pawar: देशातील राजकारणाचा स्तर खालावत चालला आहे. सूडाच्या दृष्टीकोनातून विरोधकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून मागील काही काळापासून सातत्याने होताना दिसत आहे. पक्ष फोडाफोडीचं राजकारण, सत्तांतर यासारख्या गोष्टींमुळे राजकारणाचा चिखल झाल्याचं अगदी राज ठाकरेंनीही काही आठवड्यांपूर्वी दिलेल्या भाषणा म्हटलं. देशातील राजकारणावरुन चिंता व्यक्त केली जात असतानाच आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचे राजकीय विरोधक असलेल्या शरद पवारांना लिहिलेलं एक जुनं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

कधी लिहिलेलं हे पत्र?

बाळासाहेब ठाकरेंनी 15 नोव्हेंबर 2006 साली तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना त्यांच्या प्रकृतीसंदर्भात विचारपूस करणारं पत्र लिहिलं होतं. राजकीय विरोधक असणारे हे दोघेही चांगले मित्र असल्याचं प्रत्येकाला ठाऊक होतं. या दोघांमधील मैत्रीचा हाच जिव्हाला बाळासाहेबांनी शरद पवारांना लिहिलेल्या या पत्रातून दिसून येत आहे. या पत्रातील मजकूर जसाच्या तसा खालीलप्रमाणे...

प्रिय शरदबाबू यांसी

जय महाराष्ट्र!

आपण केंद्र शासनात कृषिमंत्री या पदावर विराजमान आहात. तरीपण हे पद बाजूला सारुन आपल्याला मी माझे जुने मित्र शरदबाबू या नावानेच विचारणार आणि बोलणार. आपण बरे झालात हे ऐकून बरे वाटले; परंतु वडीलधाऱ्या अधिकाराने आम्ही आपल्याला आदेश देत आहोत की, यापुढे जरा वणवण कमी करा. झेपेल तेवढे जरुर करा! पण अलीकडे आपला दौऱ्यावर जाण्याचा सुकाळ झाला होता. वाकड्यातिकड्या मार्गाने आपण दौरे करीत होता. परदेश दौऱ्यांतही कोठे कमतरता नव्हती. आपल्या पक्षाची निळाणी जरी घड्याळ असली तरी आणि त्या घड्याळाचे काटे जरी स्थिरावे असले तरी आपल्या आयुष्याचे घड्याळ टिक टिक करीत त्याचे काटे पुढे सरकतच असतात हे विसरु नये. 

नक्की वाचा >> 'पवार संपले म्हणणाऱ्या नेत्याला अडीच वर्ष...'; शरद पवारांचा फडणवीसांना पॉवरफूल टोला

सोनियाच्या 'कथील' राजवटीत आपण अन्न व शेती मंत्री आहात सध्याच्या परिस्थितीत हे महत्त्वाचे खाते आपण संभाळीत आहात. त्यामुळे फक्त महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आपली गरज आहे. पुन्हा बजावतो, महाराष्ट्राला तर आफली नक्कीच गरज आहे; परंतु देशाची भयानक अवस्था पहिल्यावर आपल्यासारख्यांची देशाला नितांत गरज आहे. त्यामुळे स्वत:साठी नसले तरी महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी तुम्हाला जगावेच लागेल. त्याप्रमाणे वागणूक ठेवावी व प्रकृतीची काळजी घ्यावी. 

कळावे
आपला नम्र
(बाळ ठाकरे)
शिवसेनाप्रमुख

ताजा कलम : आपण घरी आल्यावर हितचिंतकांच्या झुंडीच्या झुंडी आपल्या दारावर आदळतील त्यांना आवर घालावा!

आव्हाड म्हणतात, 'नवीन पिढी हे वाचेल तर...'

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन या पत्राचा फोटो शेअर केला आहे. "शिवसेनाप्रमुखांचे पत्र शरद बाबूंना... आदेश दिला होता त्यांनी थोरला म्हणून प्रत्येक शब्दात आपलेपणा! नाहीतर द्वेष सुडाने भरलेले आजचे राजकारण, कोण कधी मरतो याची वाट पाहणारे. नवीन पिढी हे वाचेल तर म्हणेल, “राजकरणात एवढी प्रेम आपुलकी एकमेकांबद्दल होती,” अशी कॅप्शन आव्हाड यांनी दिली आहे.

हा तर प्रेमळ दम

हे पत्र म्हणजे बाळासाहेबांनी शरद पवारांन प्रकृतीसंदर्भात काळजी घेण्यासंदर्भात दिलेला प्रेमळ दमच असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. सध्याचे राजकारणी या अशा पत्रामधून काही शिकणार की नाही? असा प्रश्न आता सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.

Read More