Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

औरंगाबादमध्ये मुलं पळवणाऱ्यांच्या अफवा, निष्पापांना मारहाण

औरंगाबाद शहर असो वा जिल्हा सगळीकडेच सध्या चोरांबाबत, मुलं पळवणाऱ्यांबाबत अफवा पसरतायत.

औरंगाबादमध्ये मुलं पळवणाऱ्यांच्या अफवा, निष्पापांना मारहाण

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबाद शहर असो वा जिल्हा सगळीकडेच सध्या चोरांबाबत, मुलं पळवणाऱ्यांबाबत अफवा पसरतायत. त्यामुळे निष्पाप नागरिकांना मारहाणीच्या घटनाही घडल्यात. भीतीच्या वातावरणामुळे नागरिकांनीच आता रात्रीच्या वेळी जागता पहारा सुरु केलाय. सध्या औरंगाबाद शहर असो वा लगतचा भाग, सगळीकडे एकच नारा आहे, तो म्हणजे जागते रहो... अनेक वसाहतीत नागरिक रात्र जागून काढताय.. औरंगाबादच्या मिटमीटा परिसरातील ही रात्रीची दृष्य आहेत. अनेक नागरिक हातात लाठ्या काठ्या घेवून फिरतायत. त्या कुणाला मारण्यासाठी नाहीत तर चोरांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी आहेत.

औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात सध्या अफवांच पिक आलंय. कुठं चोर रात्री येतात, दरोडेखोर मारहाण करतात, तर कुठं लहान मुलं पळवून नेतात अशा चर्चा आहे. या अफवांमुळे औरंगाबादमधील नागरिकांची झोप उडवलीय.

दिवसभर नोकरी आणि रात्री अशाप्रकारे खडा पहारा देण्याची वेळ इथल्या नागरिकांवर आलीय. पोलीस बंदोबस्तासाठी येत नसल्याने सुरक्षेसाठी स्वतःला काठ्या हाती घ्याव्या लागल्याचं नागरिक सांगतायत.

पोलीस मात्र अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करतायत. चोरांपेक्षा अफवांचेच पिक जास्त आलंय. त्यामुळं घाबरू नका आणि कायदा हातात घेऊ नका, असं आवाहन पोलीस करतायत.

चोर समजून मारहाणीच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्यात. अनेकांना गंभीर दुखापत झालीय, तर दोघांनी जीवसुद्धा गमावलाय. अशात नागरिकांनी अफवांना आला घालण्याची गरज आहे. तर पोलिसांनी सुद्धा फक्त आवाहन न करता नागरिकांच्या मनातून भिती बाहेर काढणं गरजेचं आहे. दुर्देवानं हे दोन्हीही होत नाही आहे आणि त्यामुळंच अफवांचं हे पिक जोरात सुरु आहे.

Read More