Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कसा व्हायचा महाराष्ट्र गतिमान? शाळेत शिक्षक नसल्याने इयत्ता पहिलीतल्या मुलांना शिकवतायत चौथीचे विद्यार्थी

Amravati News : अमरावतीच्या जिल्हा परिषद शाळेतील हा प्रकार पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. शिक्षक नसल्यामुळे चौथीचे विद्यार्थी पहिली दुसरीच्या मुलांना शिकवत असल्याचे पाहायला मिळालं आहे. वरिष्ठांच्या दबावामुळे हे सुरु असल्याचे पालकांनी म्हटलं आहे.

कसा व्हायचा महाराष्ट्र गतिमान? शाळेत शिक्षक नसल्याने इयत्ता पहिलीतल्या मुलांना शिकवतायत चौथीचे विद्यार्थी

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : निरक्षरांची (Illiterate) संख्या निश्चित करण्यासाठी आता राज्यात नवभारत साक्षरता कार्यक्रम (saksharta abhiyan) राबवला जाणार आहे. 17 ते 31 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या या अभियानात निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. मात्र शाळेच्या वेळेतच हे सर्वेक्षण सुरू असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून सर्व शिक्षक या अभियानात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहेत.

या साक्षरता अभियान सर्वेक्षणामुळे चांदूर तालुक्यातील घुईखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चक्क चौथ्या वर्गाचे विद्यार्थी पहिल्या, दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक हे गावात सर्वेक्षणाकरता जात असल्याचे चौथीचे विद्यार्थ्यी पहिल्या दुसरीच्या मुलांना शिकवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव असल्याने शिक्षकांना हे काम करावं लागतं असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

"मुलाला जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकलं असून तो पहिलीच्या वर्गात शिकत आहे. घराजवळच शाळा असल्याने मला मुलांचा आवाज येत होता त्यामुळे मी आत जाऊन पाहिलं. तिथं जाऊन पाहिलं तर चौथीच्या वर्गातील मुलगी पहिल्याचा मुलांना शिकवत होती. याबाबत शिक्षकांना विचारले असते त्यांनी सांगितले की सारक्षता अभियान सुरु असल्याने सर्व शिक्षिका साक्षरता सर्वेसाठी गावात गेल्या आहेत. सरांनी एक दोन तासांसाठी असे शिकवण्यास सांगितले आहे. वरून दबाव असल्यामुळे आम्हाला हे सगळं काम 24 तारखेच्या आत पूर्ण करुन द्यायचं आहे असे शिक्षिकेने सांगितले," असे अफसर पठाण या पालकाने सांगितले.

दरम्यान, देशात नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्या अंतर्गत 15 वर्षे आणि त्या पुढील वयाच्या निरक्षरांचा शोध घेण्यासाठी राज्यात 17 ते 31 ऑगस्ट यादरम्यान सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नवभारत साक्षरता कार्यक्रमातून राज्यात 2023-24 मध्ये 12 लाख 40 हजार निरक्षर नागरिकांचा शोध घेण्यात येणार आहे. राज्यातील निरक्षरांची संख्या निश्चित करणे, त्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने शिक्षण उपल्बध करून देणे, हा सर्वेक्षणाचा उद्देश आहे. या कालावधीतच शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहीमही राबवण्यात येणार आहे. त्यासाठी शाळा हे युनिट म्हणून काम करणार आहे. त्यामुळे वस्ती, वाडी, गाव, खेडी, तांडे, शेतमळा, वॉर्ड अशा ठिकाणी जाऊन सर्वेक्षण करावे लागणार आहे. सर्वेक्षणामध्ये निरक्षरांचे नाव, लिंग, जात प्रवर्गनिहाय अद्ययावत माहिती संकलित केली जाणार आहे. तसेच त्याचे स्वतंत्रपणे विश्लेषण केले जाणार आहे.  शिक्षकांना घरोघरी जाऊन ही माहिती गोळा करावी लागणार आहे.

Read More