Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

राज-उद्धव एकत्र येणार का? अमित ठाकरे म्हणाले, "एक आमदाराचे आम्ही 100 आमदार करु पण..."

Amit Thackeray On Raj-Uddhav Coming Together: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये 'एक सही संतापाची' मोहीम राबवली जात असून त्याचसंदर्भात अमित ठाकरेंनी आपलं मतप्रदर्शन केलं आहे.

राज-उद्धव एकत्र येणार का? अमित ठाकरे म्हणाले,

Amit Thackeray On Raj-Uddhav Coming Together: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासहीत काही राष्ट्रवादी आमदारांनी मागील रविवारी शिंदे सरकारमध्ये सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 'चिखल करुन ठेवलाय' असं म्हटलं होतं. दरम्यान अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अन्य 9 सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईमधील शिवसेनाभवनासमोर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आता तरी एकत्र यावं या मजकुरासहीत बॅनरबाजी झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर आठवडाभरात राज्यातील वेगवगेळ्या शहारांमध्ये अशाच प्रकारची बॅनरबाजी झाल्याने हे दोन्ही भाऊ एकत्र येणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. त्यातच आता राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनी (Amit Thackeray) 'झी 24 तास'शी बोलताना राज आणि उद्धव एकत्र येणार का यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर दिलं आहे. 

'एक सही संतापाची' मोहीम का सुरु केली?

राज्यातील बंडखोरीच्या राजकारणावर लोकांना व्यक्त होण्यासाठी मनसेच्या माध्यमातून 'एक सही संतापाची' मोहीम सुरु करण्यात आली आहे. 8 आणि 9 जुलै रोजी राज्यातील वेगवगेळ्या शहरांमध्ये ही मोहीम राबवली जात आहे. याचसंदर्भात  'झी 24 तास'शी बोलताना अमित ठाकरेंनी ही मोहीम का सुरु करावाशी वाटली? याबद्दल भाष्य केलं. "हा जो काही राजकीय चिखल झाला आहे त्यामध्ये आपण राजकीय पक्षांची प्रतिक्रिया घेतोय. पण या पक्षांना सत्तेत बसवणाऱ्यांची प्रतिक्रियाच आपण घेत नाही. मला वाटतं की लोकांनी संताप व्यक्त करणं गरजेचं आहे आणि हा संताप ते व्यक्त करत आहेत. लोकांची प्रतिक्रिया फार महत्त्वाची आहे," असं अमित ठाकरे म्हणाले.

परिस्थिती बदलण्यासाठी नेमकं काय झालं पाहिजे?

यावेळी अमित ठाकरेंना, "ही परिस्थिती बदलण्यासाठी नेमकं काय झालं पाहिजे?" असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला अमित ठाकरेंनी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर देत, "राजसाहेब सत्तेत आले पाहिजेत," असं म्हटलं. 

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येणार?

"गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे अशापद्धतीचे बॅनर, पोस्टर काही ठिकाणी पहायला मिळाले," असं म्हणत अमित ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अमित ठाकरेंनी, "आजपर्यंत आमची जी काही परिस्थिती आहे तिथपर्यंत आम्हाला साहेबांनी पोहचवलं आहे. मी मगाशी पण बोललो की मुलगा म्हणून मला अभिमान आहे की आम्ही या चिखलात कुठे नाही आहोत. एक आमदाराचे आम्ही 100 आमदार करु ओ पण या चिखलातून बाहेर कसे येणार? मला ठाऊक आहे की पुढचे निर्णय पण साहेबच घेतली. दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सत्तेत येणं अत्यंत गरजेचं आहे. ते म्हणजे राजसाहेब ठाकरे. इतर कोणी नाही," असं मत व्यक्त केलं.

दौऱ्यांबद्दल काय म्हणाले?

"आगामी काळात तुमचे आणि राज ठाकरेंचेही दौरे चालू होत आहेत. राज ठाकरे कोकण दौरा करणार आहेत," असं म्हणत अमित ठाकरेंना आगामी नियोजनासंदर्भात विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी, "हो मला वाटतं नियोजित दौरे लवकरच सुरु होतील. तुमच्यापर्यंत लवकरच ही माहिती येईल. माझा 18 पासून उत्तर महाराष्ट्राचा दौरा आहे. आम्ही शांतते पक्षबांधणी करतोय, लोकांपर्यंत पोहोचतोय. याचा निकाल तुम्हाला पुढच्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये दिसेल," असा विश्वास व्यक्त केला. 

"राजसाहेब व्यक्त होतील"

तसेच, मुंबईदेखील मेळावा घेऊन भूमिका स्पष्ट केली जाईल? असं विचारल्यावर अमित ठाकरेंनी, "नक्कीच. साहेबांनी त्या दिवशीच सांगितलं की ती तारखी ठरत आहे. ती तारीख ठरल्यानंतर साहेब नक्कीच व्यक्त होतील," अशी प्रतिक्रिया नोंदवली.

Read More