Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

काठी न् घोंगडं घेऊ द्या की रं... मला बी ... अजित पवार धनगरी वेशात

खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धनगरी वेशातील हटके लुक चांगलाच चर्चेत आला आहे. जेजुरी गडावर अजित पवारांचा काठी आणि घोंगडी देत सत्कार करण्यात आला. 

काठी न् घोंगडं घेऊ द्या की रं... मला बी ... अजित पवार धनगरी वेशात

Ajit Pawar in Jejuri :  जेजुरीत आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आगळ्या रुपाची चर्चा पाहायला मिळाली. जेजुरी गडावर अजित पवारांचा काठी आणि घोंगडी देत सत्कार करण्यात आला. त्यानंतर अजित पवार यांना पारंपरिक पगडीही परिधान करण्यात आली. मात्र, कार्यक्रमाला जाताना अजित पवारांनी आपली हीच वेषभूषा कायम ठेवली. हातातली काठी वाजवतच त्यांनी जेजुरी गड उतरला. त्यांच्या या वेषभूषेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतल.

येळकोट येळकोट जय मल्हारचा घुमलेला नाद. खोब-याचा कुटका आणि पिवळ्याधम्मक भंडा-याचा भडका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी जेजुरी गडावर खंडोबाची तळी भरली. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या मल्हारी मार्तंडांच्या जेजुरी नगरीत सोमवारी शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. मात्र, त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी गडावर जाऊन लाडक्या खंडोबारायांचं दर्शन घेतलं. विधीवत मल्हारी मार्तंडाची आरती केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आगळी वेगळी वेशभूषा

याप्रसंगी काठी, घोंगडं आणि पारंपरिक पगडी देऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यात लक्ष वेधून घेतलं ते अर्थातच अजित पवार यांनी. एरव्ही पांढ-याशुभ्र सद-यात वावरणारे अजिदादा धनगरी वेशात उठून दिसत होते. हातातली घुंगराची काठी वाजवतच ते जेजुरी गड उतरून कार्यक्रमस्थळी रवाना झाले.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेवर आलं. आता अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही सत्तेत सहभागी झाल्यानं महायुती सरकार सत्तारूढ झाले. काठी न् घोंगडं घेऊ द्या की रं... मला बी सत्तेत राहू द्या की रं... असा नवसच जणू आता या ट्रिपल इंजिन सरकारनं खंडेरायांकडे केलेला दिसतोय.

जेजुरी नगरीत शासन आपल्या दारी 

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या मल्हारी मार्तंडाच्या जेजुरी नगरीत आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील जेजुरीत उपस्थित होतोय. या सर्वांनी कार्यक्रमाआधी मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेतलं. येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत शासन आपल्या दारी कार्यक्रमाची सुरूवात झाली. 

Read More