Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'अरे बळीराजा नको करू आत्महत्या' शाळेत मुलाची कविता; शेतकरी बापाची घरी आत्महत्या

काळीज पिळवटून टाकणारी घटना 

'अरे बळीराजा नको करू आत्महत्या' शाळेत मुलाची कविता; शेतकरी बापाची घरी आत्महत्या

लैलैश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबयचं नाव घेत नाही. अहमदनगरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. तिसरीतला मुलगा शाळेत काव्यवाचन स्पर्धेत 'अरे बळीराजा नको करू आत्महत्या' ही कविता सादर  करतो आणि त्यानंतर त्याच दिवशी अवघ्या दोन तासांनी  या मुलाचेच शेतकरी वडील आत्महत्येचं पाऊल उचलतात. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी या छोट्याशा गावातली ही ह्रदयद्रावक घटना अंगावर शहारे आणते. 

इयत्ता तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या इवल्याशा जीवाला काय माहित की ज्यांच्यासाठी तो ही कविता सादर करतोय तेच ही कविता ऐकणार नाहीत. प्रशांत बटुळे या मुलाने  एकीकडे सकाळी शाळेत ही कविता सादर केली तर दुसरीकडे अवघ्या दोन तासांनीच  या निरागस चिमुकल्या जीवाच्या  शेतकरी बापानेच आत्महत्येचं पाउल उचलत आपली जीवनयात्रा संपवली. वडील आपले खूप लाड करायचे, त्यांनी आत्महत्या का केली हेच या चिमुकल्याला सांगणं कठीण झालंय.

मल्हारी बटुळे या शेतकऱ्याने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलंय. मात्र अंगावर काटा तेव्हा उभा रहातो जेव्हा या शेतकरी बापाच्या चिमुकल्या जीवाची ही घालमेल डोळ्यासमोर येते. प्रशांत बटुळे हा भारजवाडी गावच्या शाळेचा चुणचुणीत विद्यार्थी. शाळेत काव्यवाचन स्पर्धेत त्याने स्वतःच रचलेली ही कविता. इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या या चिमुकल्या जीवाने  सादर केलेल्या या कवितेला टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळतो. शिक्षकांकडून, मित्रांकडून खूप कौतुकही होतं. मात्र या कौतुकाच्या आठवणी घरी घेऊन गेल्यानंतर या चिमुकल्या जीवापुढे काहीतरी वेगळंच मांडून ठेवलं होतं आणि ते अत्यंत ह्रदय पिळवटून टाकणारं होतं. 

डोक्यावर कर्जाचा बोजा आणि नापिकीमुळे आलेली निराशा यामुळे मल्हारी बटुळे यांनी आत्महत्या केल्याचं त्यांच्या घरचे सांगताहेत. आपल्या मुलाचं असं जाणं वृद्ध आईला किती वेदनादायी असू शकतं हे आईचं जाणे.

तिसरीत शिकणाऱ्या आपल्या पोटच्या गोळ्याची ही कविता एकदा तरी या शेतकरी बापाने ऐकायला हवी होती. कदाचित त्यांनी आपला आत्महत्येचा विचार तिथल्या तिथे सोडून दिला असता. मात्र असं होणार नव्हतं. आपल्या शेतकरी बापाची घालमेल या चिमुकल्या जीवाने जणू आपल्या मनात बरेच दिवसांपासून साठवली होती. आपल्या वडिलांची चाललेली ओढाताण आपल्या डोळ्यांनी टिपली होती. 

या निरागस चिमुकल्या जीवाला या वयात अशी कविता सुचणं यातच सारं काही आलं. शेतकरी आत्महत्येचा अनेक घटना याआधीही घडल्या आहेत. मात्र मुलाने अरे बळीराजा नको करू आत्महत्या अशी कविता सादर करणं आणि त्यानंतर अवघ्या दोनच तासात त्याच्याच जन्मदात्या शेतकरी बापानं आत्महत्या करणं यापेक्षा दुर्दैवं  ते काय..? या निरागस चिमुकल्या जीवाला या संकटातून सावरण्याचं बळ मिळो हीच प्रार्थना.

  

Read More