Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

शेतकरी तरुणाने 2 लाख रुपये देऊन लग्न केलं, 20 व्या दिवशीच बसला धक्का, नवरीमुलगीच निघाली...

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतकरी तरुणाने मुलगी मिळत नसल्याने एका मध्यस्थीच्या माध्यमातून लग्न केलं होतं, यासाठी त्याने 2 लाख रुपये दिले होते. पण लग्नाच्या 20 व्या दिवशीच तरुणाला धक्का बसला.   

शेतकरी तरुणाने 2 लाख रुपये देऊन लग्न केलं, 20 व्या दिवशीच बसला धक्का, नवरीमुलगीच निघाली...

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या नावाखाली शेतकरी तरुणाची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. ज्या मुलीला लग्न करुन त्याने घरी आणलं तिने घरातून सर्व दागिने आणि मोटरसायकल घेऊन पळ काढल्याने तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. शेतकरी तरुणाने मुलगी मिळत नसल्याने एका मध्यस्थीच्या माध्यमातून लग्न केलं होतं, यासाठी त्याने 2 लाख रुपये दिले होते. पण लग्नाच्या 20 व्या दिवशीच नववधूने समृद्धी महामार्गावरुन आपल्या साथीदारासह पळ काढला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. 

खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे ही घटना घडली आहे. येथील शेतकरी कुटुंबातील एका तरुणाला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. यादरम्यान त्याला एक मध्यस्थी करणारी व्यक्ती भेटली. त्याने आपल्याकडे लग्नासाठी एक स्थळ असल्याचं सांगितलं. यानंतर त्याने एका मुलीचे फोटो दाखवले. मुलगी नागपूरची असल्याचं त्याने सांगितलं. मुलगी दिसायला सुंदर असल्याने तरुण आणि त्याचं कुटुंब लग्नासाठी तयार झालं होतं. 

यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची चर्चा झाली. यावेळी मध्यस्थीने मुलीचं कुटुंब गरीब असल्याची खोटी बतावणी केली. तसंच लग्नासाठी त्यांना 2 लाख रुपये द्यावे लागतील असं सांगितलं. इतके आधीच लग्नाला मुलगी मिळत नसल्याने आणि आपली फसवणूक होत असल्याची अजिबात कल्पना नसल्याने मुलाचं कुटुंबही तयार झालं. त्यांनी मुलीच्या कुटुंबाला 2 लाख रुपये दिले. यानंतर लग्नाची तारीख ठरवण्यात आली. 20 दिवसांपूर्वी वेरुळ येथे हे लग्न पार पडलं. लग्नासाठी काही मोजके पाहुणे उपस्थित होते. अगदी थाटामाटात हे लग्न करण्यात आलं. दरम्यान, मुलाच्या कुटुंबाने लग्नावेळी मुलीच्या अंगावर दागिनेही घातले होते. 

पण यावेळी आपल्याला खूप मोठा गंडा घालण्यात आला आहे याची तरुणाला आणि त्याच्या कुटुंबाला अजिबात कल्पना नव्हती. लग्नानंतर 20 दिवस संसार व्यवस्थित चालला. पण 18 ऑगस्टला नववधूने बाईकची चावी मागितली आणि सगळा घोळ झाला. नववधू चावी घेऊन बाईकवर बसली. काही अंतर तिने गाडी चालवली आणि नंतर आपल्या साथीदाराला मागे बसवून फरार झाली. यावेळी तिने घरातील सर्व दागिने आणि रोख रक्कमही सोबत नेली. 

नववधूने आपल्या साथीदारासह समृद्धी महामार्गावरुन पळ काढला. ही संपूर्ण घटना समृद्धी महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. समृद्धी महामार्गावर दुचाकीला बंदी असतानाही ते त्यावरुन गेले. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या लग्नात ज्यांनी मध्यस्थी केली त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. ही एखादी टोळी असावी असा अंदाज असून त्यादृष्टीने तपास सुरु आहे. 

Read More