Marathi News> कोकण
Advertisement

निसर्ग चक्रीवादळ: राज्य सरकारने केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवलाच नाही- फडणवीस

शरद पवार यांनी कोकणाच्या उभारणीसाठी राज्य सरकारप्रमाणे केंद्रानेही मदत करण्याची गरज व्यक्त केली होती. 

निसर्ग चक्रीवादळ: राज्य सरकारने केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवलाच नाही- फडणवीस

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली: निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात झालेल्या वाताहतीनंतर राज्य सरकारने अद्याप केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवलेलाच नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते शनिवारी दिल्लीत 'झी २४ तास'शी बोलत होते. यावेळी त्यांनी निसर्ग चक्रीवादळाच्या मदतकार्यासंदर्भात भाष्य केले. महाविकासआघाडी सरकारने अद्याप केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवलेला नाही.राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यानंतरच केंद्र सरकार कोकणाला मदत करण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकेल, असे फडणवीस यांनी म्हटले. 

'राज्यातील भाजप मजबुत, रिकामटेकडे लोक फोडाफोडीच्या चर्चा करतायत'

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याता मोठ्याप्रमाणावर वाताहत झाली होती. यानंतर कोकणाचे पुनर्वसन आणि मदतकार्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने राजकारण सुरु आहे. मध्यंतरी शरद पवार यांनी निसर्ग चक्रीवादळाच्या विध्वंसानंतर कोकणाचा दौरा केला होता. त्यावेळी शरद पवार यांनी कोकणाच्या उभारणीसाठी राज्य सरकारप्रमाणे केंद्रानेही मदत करण्याची गरज व्यक्त केली होती. यानंतर केंद्रीय पथकांनीही कोकणाचा दौरा केला होता. परंतु, यानंतरही राज्य सरकारने केंद्राकडे मदत का मागितली नाही, असा सवाल आता निर्माण झाला आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच राज्य सरकारकडून निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाई वाटपाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले होते. तसेच मदतीचे उर्वरित कामही लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.कोकणात सध्या पाऊस सुरू आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रस्ते, वीजपुरवठा, मोबाईल कनेक्टीव्हीटी पूर्ववत करण्यात अडचण येत असली तरी यामधील प्रलंबित कामे ही लवकरात लवकर पूर्ण करण्यास प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.

Read More