Marathi News> भारत
Advertisement

स्लीपमोडवर असलेले चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय का होत नाहीत? समोर आले कारण

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचे रिसीव्हर ऑन आहेत.  22 सप्टेंबरपासून इस्रोची टीम विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. 

स्लीपमोडवर असलेले चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय का होत नाहीत? समोर आले कारण
Updated: Sep 30, 2023, 08:08 PM IST

Chandrayaan-3 Sleeping: चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीपमोडवर आहेत. 22 सप्टेंबरपासून इस्रोची टीम विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. यामुळे चांद्रयान 3 मोहिम नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्लीपमोडवर असलेले चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय का होत नाहीत यामागची वेगवेगळी कारणे आता समोर येवू लागली आहेत.  

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर केले यशस्वी प्रयोग

14 जुलै 2023 रोजी भारताचे चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावले. श्रीहरिकोटामधल्या स्पेस सेंटरमधून दुपारी बरोब्बर 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान 3 घेवून रॉकेट चंद्राकडे झेपावलं. LVM 3 या लाँच व्हेईकलमधून चांद्रयानाचं प्रक्षेपण करण्यात आलं. यानंतर 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 ने  चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत संशोधन केले. चंद्रावरील तापमान, हवामान, चंद्रावर होणारे भूकंप तसेच ऑक्सिजन, आर्यन तसेच इतर खनिजे या संदर्भातील भरपूर डेटा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने  गोळा केला आहे. 

चंद्रावर एक दिवस 14 दिवसांचा 

चंद्रावर एक दिवस हा पृथ्वीच्या 14 दिवसांइतका असतो. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्रावर लँड झाले तेव्हा चंद्रावर दिवस होता. 14 दिवस चांद्रयान-3 ने यशस्वी संशोधन केले. मात्र, 3 ते 4 सप्टेंबर दरम्यान चंद्रावर रात्र झाल्याने विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर  स्लीपमोडवर ठेवण्यात आले. चंद्रावर नवा सूर्योदय झाला आहे. 

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय न होण्यामागे कारण काय? 

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचे रिसीव्हर ऑन आहेत.  22 सप्टेंबरपासून इस्रोची टीम विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. चांद्रयान 3 च्या विक्रम लँडर आणि रोव्हरकडून अद्याप कोणताही सिग्नल मिळालेला नाही. संपर्क करण्याचा प्रयत्न सुरुच राहणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. आता दिवस संपत चालला आहे. पाच ते सहा दिवसात चंद्रावर पुन्हा एकदा रात्र होईल. अद्याप   विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय न होण्यामागच्या शक्यता आता समोर येवू लागल्या आहेत. दिवसा चंद्रावर 120 अंश सेल्सियस इतके तापमान असते. तर, रात्रीच्या वेळेस मायनस 250 डिग्री इतके तापमान असते. चंद्रायवर सूर्योदय झाल्यावर  सूर्यप्रकाशात बॅटरी चार्ज झाल्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय होतील अशी आशा व्यक्त केली जात होती.  चंद्रावरील तापमानाचा उपकरणांवर परिणाम होऊन ते निष्क्रिय झाले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. किंवा रेडिएशनमुळे देखील  विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्या उपकरणांमुळे तांत्रिक अडथळे निर्माण झाल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. तज्ञांकडून या शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. मात्र, इस्त्रोच्या टीम कडून याबाबत काहीच सांगण्यात आलेले नाही.