Marathi News> भारत
Advertisement

५६ इंची छाती असणाऱे दहशतवाद्यांना प्रत्युत्तर कधी देणार; काँग्रेसचा सवाल

मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेला हा अठरावा मोठा दहशतवादी हल्ला आहे.

५६ इंची छाती असणाऱे दहशतवाद्यांना प्रत्युत्तर कधी देणार; काँग्रेसचा सवाल

नवी दिल्ली:  जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे गुरुवारी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे मोदी सरकारवर निशाणा साधला. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी त्यांनी म्हटले की, दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या नातेवाईकांविषयी आम्हाला सहानुभूती आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेला हा अठरावा मोठा दहशतवादी हल्ला आहे. या ह्ल्ल्यांना ५६ इंची छाती असणारे लोक प्रत्युत्तर कधी देणार, असा टोला रणदीप सुरजेवाला यांनी लगावला.

उरी येथील हल्ल्यानंतर भारतीय लष्करावर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. पुलवामा जिल्ह्यात श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गाजवळ अवंतीपोरा भागातील गोरीपोरा येथे हा हल्ला झाला. यामध्ये सीआरपीएफचे २० जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सीआरपीएफच्या जवानांचा ताफा श्रीनगरहून जम्मूच्या दिशेने जात होता. यात दोन हजारांहून अधिक जवानांचा समावेश होता.  या मार्गावरील एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी स्फोटकांचा साठा ठेवला होता. सीआरपीएफच्या वाहनांचा ताफा जवळ आल्यानंतर दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला. आयईडी स्फोटानंतर गोळीबाराचेही आवाज येत होते. 

या हल्ल्यानंतर दक्षिण काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.  जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या अन्य तुकड्यांना अवंतीपोरा येथे पाठवण्यात आहे. तसेच जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरु करण्यात आल्याचे समजते.

Read More