Marathi News> भारत
Advertisement

'दहशतावादी पाताळात असले तरी ठेचून काढू'

भारतीय वायुदलानं बालाकोटमध्ये केलेली कारवाई ही शेवटची नसून पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया थांबत नाहीत, तोपर्यंत अशी कारवाई सुरूच राहील

'दहशतावादी पाताळात असले तरी ठेचून काढू'

अहमदाबाद : भारतीय वायुदलानं बालाकोटमध्ये केलेली कारवाई ही शेवटची नसून पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया थांबत नाहीत, तोपर्यंत अशी कारवाई सुरूच राहील, अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला खडसावलं आहे. अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. अतिरेकी पाताळात लपून बसले असतील तरी त्यांना बाहेर काढून ठेचलं जाईल. मात्र विरोधकांनी सैन्याच्या क्षमतेवर शंका घेऊ नये, असं सांगत त्यांनी विरोधी पक्षांनाही चिमटे काढले.

भारतातले नेते जी वक्तव्य करतात त्याच्या हेडलाईन पाकिस्तानच्या वृत्तपत्रात होतात. पाकिस्तानच्या संसदेमध्ये चर्चा होते. पाकिस्तान टाळ्या वाजवेल अशा गोष्टी तुम्ही बोलता? देशाच्या सैन्यानं हिंमत दाखवली आणि मी जास्त वेळ वाट बघू शकत नाही. 'चून चून के हिसाब लेना मेरी फितरत है' असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. याआधी त्यांनी जामनगरमध्येही एअर स्ट्राईकवरून विरोधकांवर निशाणा साधला. 'सेना सांगत असेल तर तुम्ही यावर विश्वास ठेवत नाही का? आपल्याला आपल्या सेनेबद्दल अभिमान असला पाहिजे. दहशतवादाचा अंत केला पाहिजे यावर देश सहमत आहे. भारतीय वायुसेनेकडे आज राफेल विमान असतं तर परिणाम वेगळे असते. पण जर काही लोकांना समजूनच घ्यायचं नसेल, तर मी काही करु शकत नाही', असं मोदी म्हणाले.

'जर राफेल विमान वेळेत मिळालं असतं, तर स्थिती वेगळी असती. जर आमच्याकडे राफेल असतं, तर आमचं एकही विमान पडलं नसतं आणि त्यांचं एकही विमान वाचलं नसतं. दहशतवादाचं मूळ हा आपल्या बाजूचा देश आहे. या आजाराला मुळासकट बरं केलं पाहिजे. जर भारताच्या नाशाचा हेतू ठेवणारा बाहेर असेल, तर भारत शांत बसणार नाही,' असा इशारा मोदींनी दिला.

कोचीला कराची म्हणाले मोदी

यावेळी बोलताना मोदींनी कोचीचा उल्लेख कराची असा केला. ही चूक लक्षात आल्यावर मोदींनी लगेच सावरून घेतलं. काय करू हल्ली डोक्यात एकच गोष्ट आहे, अशी हलकी फुलकी प्रतिक्रिया दिली.

आयुषमान भारत योजनेची स्तुती करताना मोदी कोचीऐवजी कराची म्हणाले. तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहात असाल, कोलकाता असो किंवा 'कराची' असं मोदी भाषणाच्या ओघात बोलले. 'जामनगरची एखादी व्यक्ती भोपाळमध्ये गेली आणि तिकडे आजारी पडली तर त्याला उपचारासाठी जामनगरला यायची गरज नाही. आयुषमान योजनेअंतर्गत कार्ड दाखवल्यावर त्याला कोलकाता असो किंवा कराची फुकट उपचार मिळतील,' असं मोदी म्हणाले. पण यानंतर लगेच 'मला कोची म्हणायचं होतं कराची नाही, हल्ली माझ्या डोक्यात शेजारी देशाचाच विचार असतो, असा टोमणा मोदींनी मारला.

Read More