Marathi News> भारत
Advertisement

कृष्णाची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचल्या राधा आणि गवळणी; अधिकारी म्हणाला 'यशोदाला सांगतो'

उत्तर प्रदेशच्या बागपत येथील एक अजब प्रकरण समोर आलं आहे. गोकुळाष्टमीनिमित्त राधा आणि गवळणी झालेल्या मुलींनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. यावेळी त्यांनी कृष्णाविरोधात तक्रार द्यायची आहे सांगितल्यानंतर अधिकारीही आश्चर्याने पाहत राहिला.   

कृष्णाची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचल्या राधा आणि गवळणी; अधिकारी म्हणाला 'यशोदाला सांगतो'

संपूर्ण देशभरात बुधवारी गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. एकीकडे गोविंदा थर लावून हंड्या फोडत असताना, दुसरीकडे अनेक बालगोपाळही सणात सहभागी झाले होते. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने अनेक पालकांनी मुलांना राधा आणि कृष्णाचे कपडे घातले होते. सोशल मीडियावरही मुलांचे असे अनेक फोटो, व्हिडीओ दिसत होते. यादरम्यान, एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. याचं कारण या व्हिडीओत राधा आणि गवळणींचा पोषाख घातलेल्या मुली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पोहोचल्या होत्या. ही तक्रार दुसरं, तिसरं कोणी नाही तर श्रीकृष्णाविरोधात होती. 

उत्तर प्रदेशच्या बागपत येथे ही घटना घडली आहे. येथे राधा आणि गवळणींचा पोषाख घातलेल्या मुली  पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पोहोचलेल्या पाहून पोलीस आश्चर्याने पाहत राहिले. पोलिसांनी मुलींकडे चौकशी केली असता, आपण श्रीकृष्णाची तक्रार करण्यासाठी आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. 

मुलींनी पोलीस ठाण्याचे प्रभारी राकेश शर्मा यांच्याकडे तक्रार करत सांगितलं की, कृष्ण त्यांचं मडकं फोडून सगळं दही चोरुन खातो. मुलींची ही गोड तक्रार ऐकल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याला हसू आवरत नव्हतं. यानंतर त्यांनी या मुलींना चॉकलेट देत समजूत काढली. तसंच तुमची तक्रार मी यशोदा आईपर्यंत नक्की पोहोचवतो असं आश्वासन दिलं. 

मुंबई-ठाण्यात 124 गोविंदा जखमी

मुंबई, ठाण्यात यावर्षीही दहीहंडी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी थरावरून खाली पडून 107 जण जखमी झाले. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. केईएम रुग्णालयामध्ये सर्वाधिक 31 जखमी गोविंदा दाखल केले होते.यामधील 7 जणांना दाखल करुन घेण्यात आलं. तसंच पोद्दार रुग्णालय 16 जखमींना उपचारासाठी आणलं होतं. त्यातील 6 जणांना दाखल करण्यात आलं.  राजावाडी रुग्णालयात 10 जण उपचारासाठी पोहोचले होते. त्यातील दोघांना दाखल करण्यात आलं. ठाण्यात 17 गोविंदा जखमी झाले.

Read More