Marathi News> भारत
Advertisement

देवा पुढच्या जन्मात कुत्रा बनव! जमावाकडून बिबट्याचा पाठलाग, पाठीवर बसून काढले सेल्फी; धक्कादायक VIDEO

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) देवास (Devas) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमावाने चक्क एका बिबट्याचा पाठलाग करत, त्याला त्रास दिला. इतकंच नाही तर एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे त्याला गोंजरत त्याच्या पाठीवर बसून फोटो काढले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

देवा पुढच्या जन्मात कुत्रा बनव! जमावाकडून बिबट्याचा पाठलाग, पाठीवर बसून काढले सेल्फी; धक्कादायक VIDEO

माणसाने डोक्यावर छप्पर यावं यासाठी घरं बांधण्यास सुरुवात केली. नंतर हळूहळू शहरं निर्माण झाली आणि जंगलं नष्ट होऊन तिथे काँक्रिटची जंगलं उभी राहिली. यामुळे जंगलातील प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागले. यातूनच माणूस आणि प्राणी संघर्ष निर्माण होतो. दरम्यान, काही घटना पाहिल्यानंतर माणूस आणि प्राणी यांच्यातील सर्वात धोकादायक कोण असा प्रश्न निर्माण होतो. दरम्यान असाच विचार करायला लावणारी एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. 

मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील एक अजब घटना समोर आली आहे. येथे लोकांनी एका बिबट्याला पकडलं आणि नंतर त्याचा पाठलाग करु लागले. इतकंच नाही तर त्यातील एकजण बिबट्याच्या पाठीवरही बसला होता. यादरम्यान, आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हा क्षण कैद करण्यासाठी झुंबड उडाली होती. विशेष बाब म्हणजे, बिबट्या हे सगळं घडत असताना अत्यंत शांत होता. सुदैवाने त्याने एकाही व्यक्तीवर हल्ला केला नाही. पण या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून संताप व्यक्त केला जात आहे. 

देवास जिल्ह्याच्या टोंकखुर्द तालुक्यातील प्रसिद्ध बिजासनी माता मंदिराजवळ एक बिबट्या दिसला होता. मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांना हा बिबट्या दिसला. दरम्यान, बिबट्याकडे पाहिल्यानंतर तो आजारी असल्याचं दिसत होतं. यानंतर ग्रामस्थांनी बिबट्याला पकडलं. बिबट्या आपल्या मार्गाने जात असताना, ग्रामस्थ त्याचा पाठलाग करत होते. बिबट्याला पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती.

एरव्ही माणूस दिसल्यानंतर त्यांना भक्ष्य करणारा बिबट्या यावेळी शांत बसला होता. त्याने कोणावरही हल्ला केली. गर्दीतील काहीजण हुल्लडबाजी करत असताना, काहींनी वनविभागाला फोन करुन या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच. वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि बिबट्याची ग्रामस्थांच्या तावडीतून सुटका केली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बेशुद्ध न करताच पिंजऱ्यात बंद केलं. बिबट्या आजारी असावा, ज्यामुळे त्याने ग्रामस्थांवर हल्ला केला नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 

वनविभागाचे कर्मचारी आश्चर्यचकित

या घटनेची माहिती देताना एसडीओ संतोष शुक्ल यांनी सांगितलं की, बिबट्या कधीच अशाप्रकारे वागत नाही. ग्रामस्थांच्या गर्दीतही तो शांत होता, याचा अर्थ तो आजारी असेल किंवा आजारी असणाऱ्या प्राण्याचं मांस खाल्लं असेल. या बिबट्याला सध्या तपासणीसाठी दाखल करण्यात आलं आहे. 

व्हिडीओ व्हायरल

यादरम्यान, सोशल मीडियावर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. तसंच बिबट्याला त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. वनविभागालाही व्हिडीओ मिळाला असून, त्याची पाहणी केली जात आहे. 

Read More