Marathi News> भारत
Advertisement

नाद खुळा! भाजी विकण्यासाठी चक्क ऑडीमधून येतो 'हा' शेतकरी; VIDEO पाहून सगळे हैराण

शेतकरी असा उल्लेख केला की अनेकांना शेतात राबणारा गरीब चेहरा आठवतो. श्रीमंती आणि शेतकरी यांचा संबंध तसा फार जवळचा नाही. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक शेतकरी चांगलं उत्पन्न मिळवत आहेत.   

नाद खुळा! भाजी विकण्यासाठी चक्क ऑडीमधून येतो 'हा' शेतकरी; VIDEO पाहून सगळे हैराण

श्रीमंती आणि आलिशान राहणीमान या गोष्टी आपण कधीच शेतकऱ्यांशी जोडून पाहत नाही. शेतकरी असा उल्लेख केला की शेतात राबणारा, पावसाची आतुरतेने वाट पाहणारा, घऱात असेल त्यात पोट भागवणारा असा चेहरा दाखवला जातो. पण बदलत्या काळासह आता शेतकरीदेखील बदलत चालला आहे. शेतीला दुय्यम स्थान देणारे अनेक तरुण आता नोकरी सोडून पूर्णवेळ शेतकरी झाले आहेत. तरुण शेतीत रस घेत असल्याने शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. यामुळे एरव्ही नेहमी तोट्यात असणारा शेतकरी आता चांगलं उत्पन्न आणि नफा मिळवत आहे. सोशल मीडियावर अशा अनेक यशस्वी शेतकऱ्यांचे व्हिडीओ पाहायला मिळतात. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे हे शेतकरी आलिशान आयुष्य जगू शकतात. दरम्यान असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा शेतकरी चक्क Audi A4 सेडान मधून रस्त्याशेजारी भाजी विकण्यासाठी येतो. 

ऑडी गाडीतून भाजी विकण्यासाठी येतो शेतकरी

इंस्टाग्रामवर variety_farmer या पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक शेतकरी शेतात काम करताना दिसत आहे. यानंतर तो थेट लक्झरी Audi A4 मधून मार्केटमध्ये येताना दिसतो. एका दुकानासमोर तो आपली गाडी थांबवतो. यानंतर तरुण कारमधून बाहेर येतो. यावेळी तो आपण शेतकरी असल्याचं सांगतो. कारमधून बाहेर पडल्यानंतर तो लुंगी आणि चप्पल काढतो. नंतर तिथे उभ्या असलेल्या एका रिक्षाच्या दिशेने जातो. या रिक्षातून त्याने विकण्यासाठी आणलेली भाजी आणलेली असते. 

रस्त्याशेजारी विकतो भाजी

हा तरुण शेतकरी नंतर रस्त्याच्या शेजारी भाजी ठेवण्यासाठी प्लास्टिक ठेवतो. त्यानंतर रिक्षातून काढलेली भाजी त्यावर मांडतो. यानंतर ग्राहक त्याच्याकडे भाजी खरेदी कऱण्यासाठी येताना दिसत आहेत. सगळी भाजी विकल्यानंतर तरुण पुन्हा एकदा आपले कपडे घालतो आणि ऑडीच्या दिशेने जातो. यानंतर तो कारमध्ये बसून पुन्हा निघून जाताना दिसत आहे. 

10 वर्षांपासून करतोय शेती

व्हिडीओत दिसणाऱ्या या शेतकऱ्याचं नावं सुजीत आहे. हा केरळमधील एक तरुण शेतकरी आहे. सुजीत गेल्या 10 वर्षांपासून शेती करत आहे. त्याला राज्य सरकारकडून अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. 

सुजीतने सुरुवातीला वेगवेगळी पिकं लावण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे त्याची प्रगती होत गेली. सुजीत शेतातून काढलेलं पीक थेट बाजारात नेऊन विकतो. अशाप्रकारे त्याने शेतकरी आणि ग्राहकांच्या मधे येणारे दलाल बाजूला केले आहेत. यामुळे त्याला थेट नफा कमावता येतो. सुजीतने नुकतीच ही ऑडी कार खरेदी केली आहे. 

Read More