Marathi News> भारत
Advertisement

विजय माल्ल्या कोणत्याही क्षणी भारतात येणार, प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण

भारतीय बँकांचं कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये पळालेला विजय माल्ल्या कोणत्याही क्षणी भारतात येईल

विजय माल्ल्या कोणत्याही क्षणी भारतात येणार, प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण

मुंबई : भारतीय बँकांचं कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये पळालेला विजय माल्ल्या कोणत्याही क्षणी भारतात येईल, अशी माहिती तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिली आहे. मुंबईमध्ये विजय माल्ल्याविरोधात आधीच गुन्हा दाखल आहे, त्यामुळे त्याला मुंबईतच आणलं जाणार आहे. तपास यंत्रणांमधल्या सूत्रांनी सांगितल्यानुसार माल्ल्याचं विमान सोमवारी रात्री मुंबई विमानतळावर उतरू शकतं. सोमवारी रात्री विमान मुंबईत उतरल्यानंतर काही वेळातच माल्ल्याला सीबीआयच्या कार्यालयात ठेवलं जाईल. यानंतर त्याला कोर्टात सादर केलं जाईल. 

२८ दिवसांचा कालावधी, २० दिवस पूर्ण

इंग्लंडमधल्या कोर्टाने माल्ल्याच्या भारतातल्या प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केलं होतं. नियमानुसार माल्ल्याला त्या दिवसापासून २८ दिवसांमध्ये इंग्लंडमधून भारतात आणायचं आहे, त्यामुळे २० दिवस आधीच निघून गेले आहेत. दुसरीकडे प्रत्यार्पणाची सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे माल्ल्या कधीही भारतात परतू शकतो. 

सीबीआय रिमांड मागणार 

विजय माल्ल्या मुंबईत पोहोचल्यानंतर वैद्यकीय टीम त्याच्या तब्येतीची तपासणी करेल. सीबीआय आणि ईडीचे काही अधिकारी विमानात माल्ल्यासोबत असतील. ज्यादिवशी माल्ल्या भारतात पोहोचेल, त्यादिवशी विमानतळावरून त्याला थेट कोर्टात नेलं जाईल. कोर्टामध्ये सीबीआय आणि ईडी विजय माल्ल्याची रिमांड मागतील. 

आर्थर रोड जेलमध्ये तयारी 

ऑगस्ट २०१८ साली सुनावणीदरम्यान इंग्लंडमधल्या कोर्टाने भारतीय तपास यंत्रणांकडे जेलबाबत विस्तृत माहिती मागितली होती. यानंतर मुंबईतल्या आर्थर रोड जेलमधला व्हिडिओ इंग्लंड कोर्टाला दाखवण्यात आला होता. विजय माल्ल्याला आर्थर रोड जेलमध्ये सुरक्षित बराकमध्ये ठेवण्यात येईल, असं तपास यंत्रणांनी कोर्टाला सांगितलं होतं. 

आर्थर रोड जेलमध्ये अबू सालेम, छोटा राजन, मुस्तफा डोसा यांना ठेवण्यात आलं. मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यातला दोषी कसाबही याच जेलमध्ये होता. तर शीना बोरा मर्डर केसमध्ये आरोपी पीटर मुखर्जी यांनाही आर्थर रोड जेलची हवा खावी लागली होती. 

बंद पडलेल्या किंगफिशर एयरलाईन्सचा मालक विजय माल्ल्यावर भारतातल्या १७ बँकांचे ९ हजार कोटी रुपये थकवल्याचा आरोप आहे. २ मार्च २०१६ साली विजय माल्ल्या भारत सोडून ब्रिटनला पळाला. भारतीय तपास यंत्रणांनी इंग्लंडमधल्या कोर्टात माल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी मोठी कायदेशीर लढाई लढली. यानंतर १४ मेरोजी इंग्लंडच्या कोर्टात माल्ल्याच्या प्रत्यार्पणावर अंतिम शिक्कामोर्तब झालं. 

Read More