Marathi News> भारत
Advertisement

Vice President Election 2022: देशाच्या उपराष्ट्रपतींचा पगार किती? सोबत मिळतात 'या' सरकारी सुविधा

देशाच्या उपराष्ट्रपतींना किती पगार मिळतो ? कोणत्या शाही सुविधा मिळतात? 

Vice President Election 2022: देशाच्या उपराष्ट्रपतींचा पगार किती? सोबत मिळतात 'या' सरकारी सुविधा

नवी दिल्ली : भारताचे विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे. त्याआधी 6 ऑगस्टला म्हणजेच आज देशात नवीन उपराष्ट्रपतीची निवडणूक होणार आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत तर मार्गारेट अल्वा (Margaret Alva) विरोधी पक्षाच्या उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांपैकी कोणता उमेदवार उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान देशातील दुसर्‍या-सर्वोच्च घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीला किती पगार मिळतो. तसेच कोणत्या शाही सुविधा मिळतात, हे जाणून घेऊयात. 

पगार किती ?
भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष देखील आहेत. या पदासाठी, त्यांना 'पगार आणि संसद अधिकारी अधिनियम, 1953' अंतर्गत वेतन देण्याची तरतूद आहे. उपराष्ट्रपती पदासाठी वेगळे वेतन नाही. राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांना पगार आणि इतर सरकारी सुविधा मिळतात. उपराष्ट्रपतींना दरमहा 4 लाख रुपये पगार मिळतो. याशिवाय त्यांना इतर अनेक भत्तेही मिळतात. उपराष्ट्रपतींना दैनंदिन भत्ता, वैद्यकीय, मोफत निवास, प्रवास आणि इतर सुविधांचा लाभ मिळतो.

सरकारी सुविधा कोणत्या?
राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत, उप राष्ट्रपतीला सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. अशा परिस्थितीत त्यांना राष्ट्रपतींचा पगार आणि सरकारी सुविधा मिळतात. या काळात उपराष्ट्रपतींना राष्ट्रपतींएवढे वेतन मिळते. उपराष्ट्रपतींसाठी पेन्शन पगाराच्या 50% आहे.

दरम्यान उप राष्ट्रपतीपदासाठी संसद भवनात आज सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार असून, संध्याकाळी उशिरापर्यंत देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींच्या नावाची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांकडून केली जाईल.

Read More