Marathi News> भारत
Advertisement

शरद यादवांची जीभ घसरली; वसुंधरा राजेंना म्हणाले...

 ती आमच्या मध्य प्रदेशचीच आहे. पूर्वी ती सडपातळ होती.

शरद यादवांची जीभ घसरली; वसुंधरा राजेंना म्हणाले...

अलवार: लोकतांत्रिक जनता दलाचे (एलजेडी) अध्यक्ष शरद यादव यांचे राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील भाषण सध्या चांगलेच गाजत आहे. या भाषणात शरद यादव यांनी विद्यमान मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. ते गुरुवारी राजस्थानच्या अलवार येथील सभेत बोलत होते. यावेळी वसुंधरा राजे यांच्या सरकारवर टीका करताना यादव यांनी जीभ भलतीच घसरली. त्यांनी म्हटले की, वसुंधराला आराम द्या, ती खूप थकलेय आणि जाडीही झालेय. ती आमच्या मध्य प्रदेशचीच आहे. पूर्वी ती सडपातळ होती, असे यादव यांनी म्हटले. साहजिकच यादव यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. 

यापूर्वीही शरद यादव यांनी अनेकदा महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं केली आहेत. २०१७ साली त्यांना अशाच एका विधानामुळे टीकेला सामोरे जावे लागले होते. मताची किंमत हे मुलीच्या अब्रूपेक्षा जास्त असते. मुलीची अब्रू गेली तर केवळ मोहल्ला किंवा गावाची नाचक्की होते. मात्र, मत विकले गेल्यास संपूर्ण देशाची अब्रू जाते, असे यादव यांनी म्हटले होते. 

याशिवाय, मध्यंतरी शरद यादव यांनी राज्यसभेतील चर्चेदरम्यान दक्षिण भारतीय महिलांबाबत वर्णभेदी टिप्पणी केली होती. दक्षिण भारतीय स्त्रिया सावळ्या असल्या तरी त्यांचे शरीर व त्वचा सुंदर असते. त्यांना नाचताही चांगले येते, असे वक्तव्य यादव यांनी केले होते. 

Read More