Marathi News> भारत
Advertisement

Loksabha Election 2019 : काँग्रेस उमेदवाराला अझहर मसूदचा जावई म्हणत योगींनी फुंकलं प्रचाराचं रणशिंग

काँग्रेसच्या दहशतवादविरोधी भूमिकांवरही त्यांनी खरमरीत टीका केली. 

Loksabha Election 2019 : काँग्रेस उमेदवाराला अझहर मसूदचा जावई म्हणत योगींनी फुंकलं प्रचाराचं रणशिंग

सहारनपूर : Loksabha Election 2019 लोकसभा निवडणुकांची तारीख जवळ येताच प्रत्येक पक्षातील बड्या नेत्यांनी प्रचाराच्या मैदानात उडी घेतली आहे. संपूर्ण देशभरात सध्या निवडणुकांचेच वारे वाहत असून, उत्तर प्रदेशपर्यंत निवडणुकांची ही लाट पोहोचली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ यांनी रविवारी सहारनपूर येथे भाजपच्या प्रचाराला दणक्यात सुरुवात केली. यावेळी त्यांनी सहारनपूर येथील काँग्रेसचे उमेदवार इम्रान मसूद यांचा उल्लेख अझहर मसूदचा जावई म्हणून करत काँग्रेसवर टीका केल्या. 

विरोधी उमेदवाराचा उल्लेख न करता आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर टीका केली. 'अझहर मसूदचा जावई सहारनपूरला आला असून, त्याचीच भाषा बोलत आहे. मसूदचीच भाषा बोलणाऱ्या कोणा एका व्यक्तीला सहारनपूरमधून निवडून द्यायचं आहे की प्रगती आणि सुरक्षिततेचं प्रतिक असणाऱ्या राघव लखनपाल यांची निवड करायची?', असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

केंद्रात असणाऱ्या भाजप सरकारने दहशतवादाचा प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेल्या भूमिकेविषयीही त्यांनी सांगितलं. 'तुम्ही लादेनचं नाव ऐकलंच असेल, त्याचा खात्मा अतिशय क्रूरपणे झाला होता. एके दिवशी आता अझहर मसूदही अशाच प्रकारे मारला जाणार आहे. तुम्ही याची काळजी करू नका', असं ते म्हणाले. मागील काही वर्षांमध्ये केंद्रात असणाऱ्या सरकारने दहशतवाद्यांना बिर्याणी खायला घातली. पण, आता मात्र दहशतवाद्यांना गोळ्या आणि बॉम्ब खायला घातल्या जातात, असं म्हणत काँग्रेसच्या दहशतवादविरोधी भूमिकांवरही त्यांनी खरमरीत टीका केली. 

आदित्यनाथांच्या या वक्तव्यानंतर आणि त्यांच्या एकंदर काँग्रेसविरोधी भूमिकेनंतर साहारनपूरमध्ये निवडणूकांचं वातावरण आणखी तापल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात आरोप- प्रत्यारोपांच्या या सत्रात मतदार कोणाला निवडून देत अमुक एका मतदार संघाची आणि पर्यायी देशाची सत्ता कोणाच्या हाती सोपवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Read More