Marathi News> भारत
Advertisement

UP Election 2022 : तिकिट मिळवण्यासाठी काँग्रेस नेत्याचा स्वत:वर गोळीबार, असा झाला पर्दाफाश

तिकिट मिळवण्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे  

UP Election 2022 : तिकिट मिळवण्यासाठी काँग्रेस नेत्याचा स्वत:वर गोळीबार, असा झाला पर्दाफाश

UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (UP Election 2022) सर्वच राजकीय पक्षांमध्ये तिकीट वाटपाबाबत जोरदार खलबतं सुरु आहेत. नेते तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान, पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला असून तिकीट मिळविण्यासाठी स्वत:वर गोळी झाडणाऱ्या काँग्रेस नेत्यासह 3 जणांना अटक केली आहे.

३ जानेवारीला झाला होता गोळीबार
3 जानेवारीला काँग्रेस नेत्या रिटा यादव (Rita Yadav) यांनी पोलिसांत तक्रार दिली. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात त्यांच्या पायाला गोळी लागली. रिटा यादव यांना तातडीने सुलतानपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

राजकीय फायद्यासाठी षडयंत्र 
हे प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेत तपास सुरु केला. यावेळी पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती हाती लागली. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी आणि राजकीय उंची वाढवण्यासाठी रिटा यादव यांनी स्वत:च हा कट रचल्याचं समोर आलं. रिटा यादव यांच्यासोबत धर्मेंद्र यादव आणि मोहम्मद मुस्तकीम नावाच्या दोन तरुणांनी या संपूर्ण घटनेची योजना आखली. त्यानंतर या तरुणांनी रिटा यादव यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या पायावर गोळी चालवली.

पीएम मोदींना दाखवले होते काळे झेंडे
पोलिसांनी रिटा यादव, धर्मेंद्र यादव आणि मोहम्मद मुस्तकीम यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून घटनेत वापरलेली शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. १६ नोव्हेंबरला सुलतानपूर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी रिटा यादवला अटक करण्यात आली होती.

यूपीमध्ये सात टप्प्यात विधानसभा निवडणूक
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. यूपीमध्ये 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होऊन विधानसभा निवडणुकीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात 55 जागा, 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यात 59 जागा, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 60 जागा, 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यात 60 जागा, तीन मार्चला सहाव्या टप्प्यात 57 जागा आणि 7 मार्चला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 54 जागांवर मतदान होणार आहे.

Read More