Marathi News> भारत
Advertisement

काय म्हणता! एकाच घरात राहणाऱ्या दोन बायकांनी केली पतीची वाटणी, तीन-तीन दिवस राहणार सोबत अन् रविवारी...

उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने लपून दोन लग्न केली होती. मात्र जेव्हा त्याचं भांडं फुटलं तेव्हा पत्नींनी अशी वाटणी केली की सर्वांनाच धक्का बसला  

काय म्हणता! एकाच घरात राहणाऱ्या दोन बायकांनी केली पतीची वाटणी, तीन-तीन दिवस राहणार सोबत अन् रविवारी...

वाटणी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर दोन भावांमध्ये संपत्तीवर झालेली भांडण असंच चित्र उभं राहतं. दोन्ही बाजूंना न्याय मिळावा यासाठी ज्येष्ठांच्या उपस्थिती संपत्तीचं समान वाटप केलं जातं. पण जर एखाद्या व्यक्तीला दोन बायका असतील आणि त्यांना पतीची वाटणी करुन हवी आहे असं कोणी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल ना...पण उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे अशी घटना घडल्याचं समोर आलं आहे. ठाकुरद्वारा येथील जेवर परिसरातील व्यक्तीने लपून दोन लग्न केली होती. मात्र जेव्हा त्याचं भांडं फुटलं तेव्हा पत्नींनी अशी वाटणी केली की सर्वांनाच धक्का बसला. 

नेमकं काय घडलं?

दोन महिन्यांपूर्वी एका महिलेने एसएसपींच्या कार्यालयात जाऊन पतीविरोधात तक्रार दाखल केली. यावेळी तिने पतीने निकाह केल्यानंतर मला सासरी नेण्याऐवजी भाड्याच्या घरात ठेवलं असल्याचं म्हटलं होतं. यादरम्यान त्याचं आधीच लग्न झालं असून त्याला पहिल्या पत्नीपासून तीन मुलं असल्याचं समोर आलं. महिलेने पोलिसांकडे आपल्याला न्याय देण्यासाठी दाद मागितली. 

दोन्ही पत्नींना बोलावून चौकशी

महिलेच्या तक्रारीची दखल घेत एसएसपीने दोन्ही पक्षांना बोलावलं आणि समुपदेशनासाठी पाठवलं. याठिकाणी पती आणि त्याच्या दोन्ही पत्नींशी चर्चा करण्यात आली. 

दुसऱ्या पत्नीने केला भांडाफोड

दुसऱ्या पत्नीने सांगितलं की, "2017 मध्ये फोनवर बोलताना त्यांच्यात मैत्री झाली होती. यानंतर दोघांनीही लग्न केलं. पण त्याने आपलं आधीलग्न झालं असल्याची लपवून ठेवलं होतं. त्याला दोन्ही पत्नींसह एकत्रच संसास करायचा आहे".

पहिल्या लग्नापासून तीन मुलं

समुपदेशन करणाऱ्या एमपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पतीचा चार वर्षांपूर्वी पहिला निकाह झाला आहे. पण त्याने हे लग्न लपवून ठेवत दुसऱ्या महिलेशी प्रेमविवाह केला. तो तिला घरखर्चासाठी पैसेही देत होता. पण वाद वाढल्यानंतर त्याचं लग्न झालं असून तीन मुलं असल्याचं उघड झालं".

समान खर्च आणि वेळ देण्याची कबुली

या घटनेनंतर दुसरी पत्नी प्रचंड नाराज होती. आपली फसवणूक झाल्याचं तिचं म्हणणं होतं. पण अखेर तिघांशी चर्चा केल्यानंतर तोडगा काढण्यात आला आहे. त्यानुसार दोन्ही पत्नी सासरीच राहणार आहेत. दोघींनाही पती समान खर्च आणि वेळ देणार आहे. त्यामुळे आठवड्यातील प्रत्येकी तीन दिवस दोघींमध्ये विभागून देण्याचं ठरलं आहे. फक्त एका दिवशी पती आपल्या मनाप्रमाणे वागू शकणार आहे.

Read More