Marathi News> भारत
Advertisement

हाच खरा श्रावणबाळ; नेत्रहीन आईवडिलांना आधार देण्यासाठी 8 वर्षांचा चिमुरडा चालवतो रिक्षा

दृष्टीहीन आई- वडिलांना कावडीतून नेणाऱ्या श्रावणबाळाची कथा आपण नेहमीच ऐकली आहे

हाच खरा श्रावणबाळ; नेत्रहीन आईवडिलांना आधार देण्यासाठी 8 वर्षांचा चिमुरडा चालवतो रिक्षा

मुंबई : दृष्टीहीन आई- वडिलांना कावडीतून नेणाऱ्या श्रावणबाळाची कथा आपण नेहमीच ऐकली आहे. पण, सध्या खऱ्याखुऱ्या श्रावणबाळानं अनेकांचंच हृदय पिळवटून टाकलं आहे. 

अवघ्या आठ वर्षांच्या एका चिमुकल्यानं इलेक्ट्रीक ऑटोचं स्टेअरिंग हातात घेत आपल्या नेत्रहीन आईवडीलांचं पोट भरण्याची आणि कुटुंबाला आधार देण्याची जबाबदारी हाती घेतली आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर इथल्या या मुलानं सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणलं आहे. 

गोपाळ कृष्ण असं त्याचं नाव असून, त्याची आई आणि वडील चित्तूरमधील चंद्रगिरी या गावामध्ये भाज्या आणि इतर काही वस्तू विकतात. कुटुंबातचा मोठा मुलगा असल्यामुळं हा अवघ्या आठ वर्षांचा चिमुरडा परिस्थितीची जाण ठेवत इवल्याश्या पंखांवर सारा भार घेत आहे. 

तिसरी इयत्तेत शिकणारा गोपाळ कृष्ण मोकळ्या वेळात ही इलेक्ट्रीक रिक्षा चालवतो. दर दिवशी शाळेच्या गणवेशामध्ये तो आई- वडिलांना ते भाज्या विक्री करतात त्या ठिकाणी सोडताना दिसतो. 

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी आई- वडिलांना या ऑटोनं वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी नेईन. मोठा मुलगा असल्याच्या नात्यानं कुटुंबाला मदत करणं ही माझी जबाबदारी आहे, असं भाबडा गोपाळ कृष्ण म्हणतो. गोपाळच्या आईनं स्थानिक प्रशासनाकडे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची विनंती केली आहे. 

'शासनानं आमच्या पेन्शनचा निधी वाढवावा. सध्या आम्हाला 3 हजार रुपये पेन्शन स्वरुपात मिळतात. शासनानं आम्हाला घर दिलं आणि मुलांच्या शिक्षणात मदत केली तर आमच्यावर मोठे उपकार होती', अशी विनवणी गोपाळच्या आईनं केली. 

हल्लीच गोपाळला कमी वयातच वाहन चालवताना पोलिसांनी पकडलं होतं. ज्यानंतर तो यापुढं कधीच ऑटो चालवणार नाही, याची हमी करुन घेत त्यांनी जप्त केलेली ऑटो परत केली होती, अशी माहिती समोर आली आहे. 

Read More