Marathi News> भारत
Advertisement

बालाकोटच्या तळावर जैशकडून ४५ ते ५० दहशतवाद्यांना प्रशिक्षण- सूत्र

यामध्ये आत्मघातकी दहशतवाद्यांचा (सुसाईड बॉम्बर्स) समावेश असल्याचे कळते.

बालाकोटच्या तळावर जैशकडून ४५ ते ५० दहशतवाद्यांना प्रशिक्षण- सूत्र

नवी दिल्ली: भारतीय वायूदलाने एअर स्ट्राईकमध्ये उद्ध्वस्त केलेल्या बालाकोट येथील तळावर जैश-ए-मोहम्मदने पुन्हा एकदा दहशतवाद्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. याठिकाणी सध्या ४५ ते ५० दहशतवाद्यांचे प्रशिक्षण सुरु असून यामध्ये आत्मघातकी दहशतवाद्यांचा (सुसाईड बॉम्बर्स) समावेश असल्याचे कळते. 

भारतीय गुप्तचर यंत्रणा दहशतवाद्यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यापैकी काही दहशतवाद्यांना काश्मीरमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ले करण्यासाठी पाठवले जाऊ शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे भारतीय लष्कराकडूनही जवानांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. 

हवाई दलाकडून बालाकोट एयर स्ट्राइकचा व्हिडिओ जारी

फेब्रुवारी महिन्यात जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या दहशतवाद्यांना पुलवामा येथे केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला होता. यामध्ये ४४ भारतीय जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय वायूदलाने बालाकोटच्या तळावर एअर स्ट्राईक केला होता. बालाकोटमधला जैशचा सर्वात मोठा दहशतवादी तळ हा मौलाना युसूफ अजहर उर्फ उस्ताद घोरी हा चालवत होता. भारताच्या मिराज विमानांच्या ताफ्याने या तळावर तब्बल १००० किलो स्फोटकांचा वर्षाव केला होता. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे अनेक दहशतवादी ठार झाले होते. यामध्ये जैशचे दहशतवादी, म्होरके, कमांडर्स, ट्रेनर्सचा समावेश होता. 

बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने उचललं महत्त्वाचं पाऊल

यानंतर आठ महिन्यांनी बालाकोटच्या तळावर दहशतवाद्यांच्या हालचाली पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी बालाकोटचा दहशतवादी तळ पाकिस्तानकडून पुन्हा कार्यरत करण्यात आल्याची माहिती दिली होती. 

Read More