Marathi News> भारत
Advertisement

श्रीनगरच्या सौरामध्ये दगडफेक, आठ दिवसानंतर गृहमंत्रालयानं दिली माहिती

'अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर आत्तापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये एकही गोळीबाराची घटना घडलेली नाही, याचा आम्ही पुनरुच्चार करतोय'

श्रीनगरच्या सौरामध्ये दगडफेक, आठ दिवसानंतर गृहमंत्रालयानं दिली माहिती

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द झाल्यानंतर तणावाचं वातावरण कायम आहे. याच दरम्यान, श्रीनगरच्या सौरा भागात गेल्या शुक्रवारी म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी दगडफेकीच्या घटना घडल्याची माहिती गृहमंत्रालयानं दिलीय. उल्लेखनीय म्हणजे, अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर पहिल्यांदाच गृहमंत्रालयानं जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार झाल्याचं मान्य केलंय. गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिलीय. 

'मीडियामध्ये श्रीनगरच्या सौरा भागात काही घटना घडल्याचं सांगण्यात आलं. ९ ऑगस्ट रोजी काही लोक स्थानिक मस्जिदमधून नमाजानंतर परतत होते. त्यांच्यासोबत काही समाजकंटकही होते. अशांती पसरवण्यासाठी कुणीही उकसावल्याशिवाय त्यांनी सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली. परंतु, सुरक्षा रक्षकांनी संयम दाखवला आणि कायदे-सुव्यवस्था निश्चित करण्याचा प्रयत्न केला. अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर आत्तापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये एकही गोळीबाराची घटना घडलेली नाही, याचा आम्ही पुनरुच्चार करतोय' असं ट्विट गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केलंय. 

याअगोदर हिंसाचाराच्या घटना घडल्याच नसल्याचा केला होता दावा

मीडियातून समोर आलेल्या काही बातम्यांनुसार, दगडफेक करणाऱ्यांना पांगवण्यासाठी सुरक्षादलाकडून अश्रूधुराचा आणि पॅलेट गनचाही वापर करण्यात आला. परंतु, याअगोदर सरकारकडून असं कोणतंही हिंसक आंदोलन झालं नसल्याचा दावा करण्यात आला होता. 'रॉयटर्स आणि डॉननं यांनी प्रसारित केलेल्या वृत्तात श्रीनगरमध्ये झालेल्या आंदोलनात १० हजार लोकांनी सहभाग घेतला असं म्हटलं गेलंय. परंतु, या बातम्या तत्थ्यहीन आणि चुकीच्या आहेत. श्रीनगर / बारामुलामध्ये काही तुरळक विरोध प्रदर्शन झालं परंतु, त्यात २० हून अधिक जणांचाही समावेश नव्हता' असं ट्विट याअगोदर गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांच्या ट्विटर हॅन्डलवरून करण्यात आलं होतं. 

'पॅलेट गन वापर'

दुसरीकडे, जम्मू-काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदे-व्यवस्था) मुनीर खान यांनीही 'श्रीनगर आणि इतर ठिकाणी काही स्थानिक घटना घडल्या. परंतु, यात कुणालाही मोठ्या जखमा नाहीत. या ठिकाणी काहींना पॅलेट जखमा झाल्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोणत्याही स्थानिकांना याची झळ पोहचू नये, हे आमच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे' असं म्हटलंय. त्यामुळे या भागात पॅलेट गनचा वापर झाल्याचंही समोर येतंय.

दरम्यान, अनुच्छेद ३७० आणि ३५ ए हटवण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा फडकला. जम्मू आणि लडाख भागात वातावरण शांत होतं. बारमूला, शोपिया, गांदरबल आणि पुलवामा यांसारख्या ठिकाणाहूनही कोणत्याही हिंसेची बातमी नाही.

Read More