Marathi News> भारत
Advertisement

सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय

काँग्रेसचा नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत सोनिया गांधी हे पद सांभाळणार आहेत

सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा सोनिया गांधी यांची निवड करण्यात आलीय. प्रदीर्घ चर्चा केल्यानंतरही काँगेसला भविष्यातील अध्यक्ष काही सापडलेला नाही, हे यामुळे स्पष्ट होतंय. गेल्या दीड महिन्यांपासून काँग्रेस आपल्या अध्यक्ष पदाच्या चेहरा शोधत आहे. शनिवारी झालेल्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली, अशी माहिती काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांनी दिलीय. काँग्रेसचा नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत सोनिया गांधी हे पद सांभाळणार आहेत.  

याबद्दल माहिती देताना, सोनिया गांधी आमच्या नव्या अध्यक्ष असतील. यापूर्वी राहुल गांधी यांचा राजीनामा काँग्रेसनं स्वीकार केलेला आहे. यानंतर सर्वसंमतीनं सोनिया गांधी यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलंय, असं गुलाब नबी आझाद यांनी म्हटलंय. 

काँग्रेसच्या या बैठकीत तीन प्रस्ताव संमत करण्यात आलेत. यानुसार, राहुल गांधींच्या नेतृत्वासाठी पक्षाच्या सर्वच नेत्यांनी त्यांची प्रशंसा केली. तसंच त्यांचं म्हणणं मान्य करत राहुल गांधी यांचा पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारण्यात आलाय. यानंतर पक्षाच्या नेत्यांची विनंती स्वीकार करत सोनिया गांधींनी पुढच्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत हे पद सांभाळण्याची तयारी दर्शवली. यासोबतच पक्षानं सध्या जम्मू आणि काश्मीरमधल्या परिस्थितीबद्दलही चिंता व्यक्त केलीय.   

 

काँग्रेस अध्यक्ष निवडण्यासाठी देशातील काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. उत्तर पूर्व, पूर्व, उत्तर आणि दक्षिण या पाच भागातल्या नेत्यांशी चर्चा करून अध्यक्ष निवडला जाणार आहे. 

या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदी अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत. प्रियंका गांधी-वाड्रा, मल्लिकार्जुन खर्गे, मुकुल वासनिक, सुशिलकुमार शिंदे, ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्याही नावांचा समावेश असल्याचे बोलले जातंय. त्यामुळे आता या नेत्यांपैकी कुणाच्या गळ्यात काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ पडणार हे पाहावं लागेल. 

Read More