Marathi News> भारत
Advertisement

#DelhiResults2020 : दिल्लीत पवारांच्या राष्ट्रवादीचे चारही उमेदवार पराभूत

दिल्ली विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीलाही आपलं खातं उघडता आलेलं नाही.

#DelhiResults2020 : दिल्लीत पवारांच्या राष्ट्रवादीचे चारही उमेदवार पराभूत

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजप ८ जागांवर आघाडीवर असून काँग्रेसकडून अद्याप खातंही उघडण्यात आलेलं नाही. दिल्लीत आप, भाजप, काँग्रेससह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. मात्र राष्ट्रवादीलाही आपलं खातं उघडता आलेलं नाही. 

दिल्ली विधानसभा निवडणूक रिंगणात राष्ट्रवादीचे चार उमेदवार उतरले होते. परंतु चारपैकी एकालाही दिल्लीकरांची पसंती मिळालेली नाही. 'आप'समोर राष्ट्रवादीला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. राष्ट्रवादीच्या फतेह सिंह, राणा सुजित सिंह, मयूर भान, झाहिद अली यांचा दारुण पराभव झाला आहे.

दिल्लीत राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून आला नाही. मात्र, शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिल्लीत आमची फारशी ताकद नसल्याची कबुली दिली होती. परंतु, 'आप'चा विजय हा अपेक्षितच होता, त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, असे पवारांनी सांगितले. दिल्लीत अनेक मराठी भाषिक राहतात. या लोकांचाही अरविंद केजरीवाल यांनाच पाठिंबा होता, असे पवारांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.

आम आदमी पक्षाने समोठा विजय मिळवला आहे. 'आप'ने ६३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने ८ जागांवर आघाडी घेतली. अंतिम निकाल घोषित होणार असले तरी 'आप'ने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे 'आप' कार्यालयात जल्लोष दिसून येत आहे. 'आप' पुन्हा एकदा बहुमत मिळवून सत्तास्थापन करणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील. 

Read More