Marathi News> भारत
Advertisement

कमलनाथ यांच्या भाच्याने नाईटक्लबमध्ये एका रात्रीत उडवले ७ कोटी रुपये

रतुल पुरीचा राजेशाही थाट पाहून सर्वजण अवाक

कमलनाथ यांच्या भाच्याने नाईटक्लबमध्ये एका रात्रीत  उडवले ७ कोटी रुपये

नवी दिल्ली: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी याने अमेरिकेतील एका नाईटक्लबमध्ये एका रात्रीत तब्बल सात कोटी रुपये उडवल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) रतुल पुरी याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. यामध्ये ईडीने म्हटले आहे की, पुरीने अमेरिकेतील एका नाइटक्लबमध्ये एका रात्री ११ लाख डॉलर्स, म्हणजेच ७ कोटी ८ लाख रुपये उडवले होते. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात रतुल पुरी यांच्या राजेशाही थाटाची चर्चा रंगली आहे. 

ईडीने गुरुवारी दिल्ली न्यायालयात ११० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये रतुल पुरी परदेशांतील हॉटेलमध्ये थांबल्याचा तपशील आहे. या दरम्यान अमेरिकेतील प्रोव्होकेटर नावाच्या एका नाइट क्लबमध्ये एकाच रात्री ७ कोटी ८ लाख रुपये उडवल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच नोव्हेंबर २०११ आणि ऑक्टोबर २०१६ च्या दरम्यान पुरीने स्वत:च्या मौजमजेसाठी सुमारे ३२ कोटी रुपये खर्च केल्याचे निष्पन्न झाले आहे.

रतुल पुरी हा मोजर बेयर इंडिया ( प्रायव्हेट) लिमिटेडचा संचालक होता. या काळात रतुल पुरी याने मोजर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम आपल्या बनावट कंपन्यांमध्ये वळती केली. तसेच बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम कमी करण्यासाठी त्याने मोजरबेअर इंडिया कंपन्यांच्या 'जटिल रचनेचा' वापर केल्याचेही ईडीने म्हटले आहे. या माध्यमातून पूरीने तब्बल आठ हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याचा ईडीचा दावा आहे. 

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातही रतुल पुरी आरोपी असून त्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी २० ऑगस्टला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे.

Read More