Marathi News> भारत
Advertisement

राजस्थानमध्ये पेट्रोल-डिझेलवरचा व्हॅट ४ टक्क्यांनी कमी

एकीकडं पेट्रोल आणि इंधनच्या भाववाढीनं देशातील जनता हैराण असताना, राजस्थानच्या नागरिकांना मात्र मोठा दिलासा मिळालाय

राजस्थानमध्ये पेट्रोल-डिझेलवरचा व्हॅट ४ टक्क्यांनी कमी

जयपूर : एकीकडं पेट्रोल आणि इंधनच्या भाववाढीनं देशातील जनता हैराण असताना, राजस्थानच्या नागरिकांना मात्र मोठा दिलासा मिळालाय. राजस्थान सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट ४ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल अडीच रूपयांनी स्वस्त होणार आहे.

आज मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. संपूर्ण देशभरात महागाईचा भडका उडाला असताना, राजस्थान सरकारचा हा निर्णय जनतेसाठी आनंदवार्ता घेऊन आलाय. बाकीची राज्य सरकारं हा फॉर्म्युला वापरणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी नवे उच्चांक स्थापन करणं सुरूच आहे. सलग पंधराव्या दिवशी इंधन दरवाढ झालीय.  पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागलंय. पेट्रोल १२ पैशांनी तर डिझेल ११ पैशांनी महागलंय. मुंबईत पेट्रोलसाठी प्रतिलिटर ८७.८९ रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर ७७.०९ रुपये नागरिकांना मोजावे लागतायत.

पेट्रोल - डिझेलच्या दरात जीएसटी ?

रुपयामध्ये घसरण पाहायला मिळाल्यामुळे भारतात कच्चा तेलाच्या दरात सतत वाढ पाहायला मिळत आहे. चार शहरात पेट्रोलची किंमत 80 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. येणाऱ्या दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी त्रास देणार असल्याचे सांगितलं जात आहे. विरोधी पक्ष सतत पेट्रोल - डिझेलच्या दरात जीएसटी आणण्याची मागणी करत आहे. तर सरकार एक्साइज  ड्युटी कमी करण्यास मनाई करत आहे.

'भारत बंद'ची हाक

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्यांना चांगलाच फटका बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दरांमध्ये लागोपाठ थोडी-थोडी वाढ होत आहे. त्यातच आता विरोधकांना सरकारच्या विरोधात चांगलंच हत्यार सापडलं आहे. काँग्रेसने वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरांविरोधात १० सप्टेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे.

भाजपाला घरचा आहेर

पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन जीएसटीच्या कक्षेत आणावं, असं मत व्यक्त केलंय. त्याच वेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र याला विरोध दर्शवलाय. इंधन दरवाढीमुळे लोकांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत असल्यामुळे आता पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणायला पाहिजे, असं प्रधान म्हणाले. टर्की, इराण, व्हेनेझुएला या देशांनी उत्पादन वाढवण्याचं आश्वासन पाळलं नसल्याचं प्रधान यांनीही अधोरेखित केलं.

दरम्यान, पेट्रोल दरवाढ विरोधात औरंगाबादमध्ये शिवसेनेनं अनोखं आंदोलन केलं. पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर लावले आहेत त्याच्याच बाजूला, शिवसेनेनं पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीचे बॅनर लावून  हेच का अच्छे दिन? असा सवाल सरकारला केला.

Read More