Marathi News> भारत
Advertisement

समोरुन एक्स्प्रेस येत असतानाच ड्रायव्हरने रेल्वे ट्रॅकवर पळवला ट्रक; ब्रेक दाबला तरी...

Golden Temple Express : पंजामध्ये गोल्डन टेंपल एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला आहे. रेल्वे ट्रॅकवर एका मद्यधुंद ट्रक ड्रायव्हरने एक किमीपर्यंत ट्रक पळवण्याने मोठा अपघात होणार होता. मात्र ट्रक रेल्वे ट्रॅकमध्ये अडकल्याने मोठा अनर्थ टळला.

समोरुन एक्स्प्रेस येत असतानाच ड्रायव्हरने रेल्वे ट्रॅकवर पळवला ट्रक; ब्रेक दाबला तरी...

Accident News : पंजाबमधील (Punjab) लुधियाना येथे रेल्वे ट्रॅकवर मोठा अपघात टळला आहे. एका मद्यधुंद ट्रक ड्रायव्हरने त्याचा ट्रक लुधियानामधील रेल्वे ट्रॅकवर सोडला होता. एक्स्प्रेस तिथून जाण्याच्या काही मिनिटे आधीच या मद्यधुंद ड्रायव्हरने हा ट्रक रेल्वे ट्रॅकवर चढवला होता. ट्रकचा ड्रायव्हर इतक्यावरच थांबला नाही. त्याने थेट रेल्वेट्रॅकवर ट्रक चालवण्यास सुरुवात केली. मात्र ट्रक तिथे अडकला. त्यामुळे ड्रायव्हरने तिथून पळ काढला. शेवटी ट्रेनच्या लोको पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. नाहीतर काहीतरी अनर्थ झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Ludhiana Police) घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला.

शुक्रवारी रात्री, गोल्डन टेंपल एक्स्प्रेस (Golden Temple Express 12903) पास होण्याच्या काही मिनिटे आधीच लुधियानामधील ग्यासपुराजवळ एका मद्यधुंद चालकाने आपला ट्रक रेल्वे रुळांवर चढवला होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यधुंद ड्रायव्हरने ट्रक रेल्वे रुळांवर किमान एक किलोमीटर चालवला. मात्र काही वेळातच ट्रक रेल्वेट्रॅकवर अडकला. ट्रक अडकल्यानंतर चालकाने गाडी रेल्वे रुळावर सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

या सगळ्या प्रकारानंतर आजूबाजूच्या लोकांनी गोल्डन टेंपल एक्स्प्रेसच्या लोको पायलटला सावध केले. त्यामुळे लोको पायलटने समजूतदारपणे ट्रेनचा वेग कमी केला आणि गाडी पुढे जाऊ दिली नाही. त्यामुळे ट्रक आणि रेल्वेची धडक टळली. खबरदारीचा उपाय म्हणून लुधियानाहून नवी दिल्लीला जाणारी स्वर्ण शताब्दी एक्स्प्रेस (१२०३०) थांबवण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक, सरकारी रेल्वे पोलिस बलराम राणा आणि पोलिस निरीक्षक जितेंद्र सिंह घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. हा ट्रक रुळावरून काढण्यासाठी अधिकाऱ्यांच्या पथकाला सुमारे दोन तास लागले. ट्रक हटवल्यानंतर सुवर्ण मंदिर एक्सप्रेसने पुन्हा प्रवास सुरू केला.

ड्रायव्हरने ग्यासपुरा गेटजवळ चुकीच्या दिशेने घुसून ट्रक रेल्वे रुळावर वळवला आणि सुमारे एक किलोमीटरपर्यंत पळत राहिला. शेरपूर उड्डाणपुलाजवळ ट्रकची चाके रुळांमध्ये अडकल्याने चालकाने ट्रक रुळांवर सोडून दिला. रुळावरून ट्रक गेल्याची माहिती मिळताच लुधियाना स्थानकात खळबळ उडाली. लुधियानाच्या दिशेने येणाऱ्या गोल्डन टेंपल एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्यांना ट्रॅकवर ट्रक असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच लोको पायलटने ट्रेनचा वेग कमी केला. एसपीएस हॉस्पिटलजवळ ट्रक रुळांवर उभा असल्याचे पाहून त्यांनी तात्काळ इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवली. त्यावेळी ट्रेनचा ट्रकला स्पर्श झाला. मात्र कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही.

दरम्यान, सुमारे दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर क्रेनच्या सहाय्याने हा ट्रक रेल्वे रुळावरून हटवून मार्गात थांबलेल्या गाड्या सोडण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत जीआरपी आणि आरपीएफने ट्रक ताब्यात घेऊन चालकाला अटक केली होती.

Read More