Marathi News> भारत
Advertisement

जनतेचा विश्वास हीच माझी कमाई - पंतप्रधान

मजबूत आणि इमानदार सरकारसाठी मतदान करण्याचे आवाहनही मोदींनी केले आहे.

जनतेचा विश्वास हीच माझी कमाई - पंतप्रधान

अकलूज : अकलूजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभेसाठी दाखल झाले आहेत. रणजीतसिंह निंबाळकर यांच्यासाठी मोदी प्रचारसभा घेत आहेत. धनगर समाजाच्यावतीने मोदींचे घोंघडी देऊन स्वागत करण्यात आले. पंढरपूर, अक्कलकोटच्या धरतीला वंदन करत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. अवकाळी पावसांमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबाबत मोदींनी दुख: व्यक्त केले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, वादळाच्या तडाख्यात सापडलेल्यांना मदत करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाषणादरम्यान त्यांनी शरद पवार तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. मोदी स्वत:सह परिवाराचंही नुकसान होऊ देत नाही. हवेची दिशा पवारांनी वेळीच ओळखली आणि वादळाला घाबरुनच पवारांनी मैदान सोडले असल्याची जोरदार टीकास्त्र सोडले आहे. 

गेल्या पाच वर्षात मी कसे सरकार चालवले ते तुम्ही पाहिले आहे. तुमच्या सेवकाने पाच वर्ष सरकार चालवले आहे. गेल्या पाच वर्षांत कोणताही भष्ट्राचार केल्याचा आरोप नाही. अशा मजबूत सरकारलाच पुन्हा निवडून देण्याचे, मजबूत आणि इमानदार सरकारसाठी मतदान करण्याचे आवाहनही मोदींनी केले आहे. आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला पुन्हा मजबूत सरकार हवे आहे की कमजोर सरकार हवे आहे. मजबूत देशासाठी मजबूत नेता हवा आहे. देशाला मजबूत सरकार हवे आहे. काँग्रेस राष्ट्रवादी भारताला मजबूत करु शकत नाही. मजबूत हिंदुस्थान बनवणे हाच आपला संकल्प असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जनतेचा विश्वास हीच माझी कमाई आहे. विरोधकांचा केवळ मोदी हटाव हाच एकच नारा आहे. मोदी हटवा याशिवाय विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही. सरकारमध्ये दम असेल तरच फौजींची बंदूक बोलते. दहशतवाद्यांना पाताळातूनही शोधून काढू. आता नवीन भारताची नवी निती आहे. 2014 नंतर देशाची रित आणि निति बदलली आहे. दहशतवाद्यांच्या कोणत्याही कारवायांना यशस्वी होऊ देणार नाही. मुंबई अतिरेक्यांचा स्वर्ग झाला होता, आता हल्ला झाला तर दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून ठेचले आहे.  

प्रचारसभेच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढाच्या जनतेने पवारांना नाकारले असून माढा, बारामतीत कमळ फुलणारच असल्याचे म्हटले आहे. माढा परिसरातील अनेक सिंचन प्रकल्प पूर्ण केले असल्याचेही मुख्यंमंत्र्यांनी म्हटले. 

Read More