Marathi News> भारत
Advertisement

लाखोंची कॅश अन् दागिने! …600 रुपये कमवणाऱ्याच्या 2 मुलींचं लग्न; अख्ख्या पोलीस स्टेशननं केलं कन्यादान

सफाई कर्मचाऱ्याची आर्थिक स्थिती पाहता पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला. पोलीस ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याने यासाठी पुढाकार घेत मदत केली.   

लाखोंची कॅश अन् दागिने! …600 रुपये कमवणाऱ्याच्या 2 मुलींचं लग्न; अख्ख्या पोलीस स्टेशननं केलं कन्यादान

पोलिसांबद्दल प्रत्येकाचं मत वेगळं असतं. अनेकजण फक्त ऐकीव गोष्टींवर पोलिसांबद्दल एक चुकीचं मत तयार करतात. पण त्या खाकी वर्दीच्या आतही माणुसकी दडलेली असते. अनेकदा काही घटनांमधून त्याचा प्रत्ययही येत असतो. जयपूरमध्ये एका लग्नात पाहुण्यांना असाच अनुभव आला. आपल्या पोलीस ठाण्यातील सफाई कर्मचाऱ्याच्या मुलींच्या लग्नाला चक्क पोलिसांनी हजेरी लावली. यावेळी ते मुलींचे भाऊ-बहिण म्हणून दाखल झाले होते. दरम्यान, पोलिसांनी केलेलं कृत्य पाहून यावेळी सर्व पाहुणे भारावले आणि टाळ्यांचा कडकडाट करत कौतुक केलं. 

सोडाला पोलीस ठाण्याचे स्वच्छता कर्मचारी पूनम चंद्र यांच्या मुलींच्या लग्नात पोलीस कर्मचारी भाऊ, बहिण म्हणून पोहोचलो होते. पोलीस कर्मचारी रोख रक्कम आणि दागिन्यांनी भरलेलं ताट घेऊन पोहोचले तेव्हा पाहुण्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत स्वागत केलं. वरिष्ठ अधिकाऱ्यांना जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची पाठ थोपटली. जयपूरमधील या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. 

जयपूरच्या सोडाला पोलीस ठाण्यात पूनम चंद्र गेल्या अनेक काळापासून सफाई कर्मचाऱी म्हणून काम करत होते. त्यांच्या मुलींचं लग्न असल्याने सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी सामूहिक योगदान दिलं. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी पैसा गोळा केला. सर्वांनी मिळून एकूण 3 लाख रुपये जमवले. यामधील काही पैशांचे दागिने खरेदी करण्यात आले. तर काहींचे कपडे घेण्यात आले आणि इतर रक्कम रोख स्वरुपात देण्यात आली. 

पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, पूनम चंद्र मागील अनेक काळापासून येथे काम करत आहेत. त्यांच्या मेहनतीसाठी त्यांना 600 रुपये मिळतात. त्यांची आर्थिक स्थिती पाहता आम्ही सर्वांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. चांगली बाब म्हणजे पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यात योगदान दिलं. 

पूनम चंद्र यांच्या वडिलांनीही याच पोलीस ठाण्यात दीर्घकाळ सेवा बजावल्याचे पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. कर्मचाऱ्यांनी पूनम चंद्राच्या आर्थिक स्थितीबद्दल एसएचओशी चर्चा केली असता त्यांनी सर्वांना आपापल्या क्षमतेनुसार योगदान देण्यास सांगितले आणि काही वेळातच सुमारे तीन लाख रुपये जमा झाले. पोलिसांच्या या कृत्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

Read More