Marathi News> भारत
Advertisement

'लोकपाल कायदा आला तर सर्वप्रथम नरेंद्र मोदी तुरुंगात जातील'

अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदीवरूनही मोदी सरकारला लक्ष्य केले.

'लोकपाल कायदा आला तर सर्वप्रथम नरेंद्र मोदी तुरुंगात जातील'

नवी दिल्ली: देशात लोकपाल कायदा अस्तित्त्वात आला तर सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांना तुरुंगात जावे लागेल, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी केले. ते मंगळवारी संसदेत अंतरिम अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलत होते. यावेळी त्यांनी राफेल गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, राफेल करारात कोणी दोषी असेल तर ते पंतप्रधान मोदीच आहेत. राफेल व्यवहार हा अंतर्गत पातळीवर झालेला घोटाळा आहे. आता मोदी त्यापासून पळ काढू पाहत आहेत. मात्र, ते फार दिवस वाचू शकणार नाहीत, असे मोईली यांनी म्हटले. 

यावेळी मोईली यांनी अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदीवरूनही मोदी सरकारला लक्ष्य केले. केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रासाठी केलेली आर्थिक तरतूद ही चीनच्या एकूण संरक्षणाच्या तरतुदीचा केवळ पाचवा भाग आहे. आता त्यातील २० टक्के रक्कम ही  राफेल विमानांसाठी खर्च होईल. यावरून सरकारचा कमकुवतपणा उघड झाल्याची टीका त्यांनी केली. 

राफेल प्रकरणी मोदींकडून गोपनीयतेच्या शपथेचा भंग, गुन्हेगारी कारवाईची राहुल गांधींची मागणी

या सगळ्या कारणांमुळेच केंद्र सरकार लोकपाल विधेयकाची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ करत आहे. कारण हा कायदा अस्तित्त्वात आला तर सर्वप्रथम मोदींना तुरुंगात जावे लागेल. या सगळ्याची जाणीव असल्यामुळेच सरकारकडून तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना नामोहरम करू पाहत आहेत. परंतु, मोदींची छाती ५६ इंचाची असली तरी ते या भ्रष्टाचाराच्या गोळीपासून वाचू शकत नाहीत, असा टोलाही मोईली यांनी लगावला.

राहुल गांधी हे विमान कंपन्यांचे दलाल- रवीशंकर प्रसाद

Read More