Marathi News> भारत
Advertisement

भूकंप होणार होता पण आलाच नाही; मोदींचा राहुल गांधींना टोला

गळाभेट घेणं आणि गळ्यात पडणं, यामधील फरक काय असतो ते मला कळले.

भूकंप होणार होता पण आलाच नाही; मोदींचा राहुल गांधींना टोला

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेतील शेवटच्या भाषणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य केले. मी राफेलच्या मुद्द्यावर बोललो तर देशात राजकीय भूकंप होईल, असे विधान मध्यंतरी राहुल गांधी यांनी केले होते. हाच धागा पकडत मोदी यांनी राहुल गांधींची फिरकी घेतली. त्यांनी म्हटले की, आम्ही ऐकून होतो की भूकंप येणार, पण पाच वर्षं झाली कोणताही भूकंप आला नाही. लोकशाहीची शक्तीच इतकी मोठी आहे की तिने भूकंपही पचवला, असे मोदींनी म्हटले. तसेच राहुल गांधी यांनी लोकसभेत दिलेल्या आलिंगनावरही मोदींनी सूचक भाष्य केले. पहिल्यांदा खासदार होऊन संसदेत आल्यानंतर मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गळाभेट घेणं आणि गळ्यात पडणं, यामधील फरक काय असतो ते मला कळले. 'आँखो की गुस्ताखियाँ' पाहायला मिळाल्या, असेही मोदींनी सांगितले. 

यावेळी नरेंद्र मोदी यांनी सरकारची कामगिरी अधोरेखित करण्याचा प्रयत्नही केला. तसेच अनेक निर्णयांमध्ये सहकार्य केल्याबद्दल सभागृहातील सदस्यांचे आभार मानले. १६ व्या लोकसभेच्या निमित्ताने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसचे गोत्र नसलेले पूर्ण बहुमतातील सरकार आले. या सगळ्याचे श्रेय २०१४ साली जनतेने घेतलेल्या निर्णयाला जात असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. दरम्यान, आजच्या कामकाजानंतर लोकसभा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. यानंतर एप्रिल महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होऊन नवीन सरकार सत्तेत येईल. 

Read More