Marathi News> भारत
Advertisement

'संसदेची सुरक्षा भेदण्यासाठी नेहरुच जबाबदार का? पास देणारा खासदार मुसलमान असता तर भाजपाने..'

Parliament Security Breach Uddhav Thackeray Group Comment: हजारो सुरक्षाकर्मी, शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे, स्कॅनर्स, अंगाची झडती घेणारी यंत्रणा असताना धुराच्या नळकांड्या घेऊन 2 तरुण आत शिरले. या दोघांनाही आत जाण्याचे ‘पास’ मिळाले ते भाजप खासदाराच्या शिफारसीने.

'संसदेची सुरक्षा भेदण्यासाठी नेहरुच जबाबदार का? पास देणारा खासदार मुसलमान असता तर भाजपाने..'

Parliament Security Breach Uddhav Thackeray Group Comment: संसदेची सुरक्षा भेदून थेट मुख्य सभागृहामध्ये प्रवेश करुन 2 तरुणींनी गोंधळ घातल्याच्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरुन गेला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित झा याला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असला तरी आता या प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे गटाने या प्रकरणावरुन भारतीय जनता पार्टीची धोरणांवरुन टीका केली आहे. या संसद घुसखोरी प्रकरणामध्ये तरुणांना पास देणारा खासदार मुसलमान असता तर भाजपाने काय केलं असतं इथपासून ते देशभरातील तरुणांत वैफल्य आहे व बेरोजगारांना रामलल्लाचे मोफत दर्शन घडवून हे वैफल्य दूर होणार नाही इथपर्यंतची टीका ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाने नेमकं काय म्हटलंय पाहूयात...

महाशक्तीची मजबूत सुरक्षा व्यवस्था असताना

"13 डिसेंबर 2001 रोजी जुन्या संसद भवनावर हल्ला झाला, त्या घटनेस 22 वर्षे झाली. त्या घटनेत हौतात्म्य पत्करलेल्या सुरक्षाकर्मींना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सकाळी संसदेच्या प्रांगणात पार पडला व दुपारी नव्या संसद भवनात घुसखोरी करून, धुराच्या नळकांड्या फोडून 4-5 तरुणांनी देशाला व संसदेला हादरा दिला. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून 2 तरुणांनी लोकसभेच्या सभागृहात उड्या मारल्या. त्यांच्याकडे पिवळा धूर सोडणाऱ्या नळकांड्या होत्या. त्यामुळे संपूर्ण सभागृहात धूर-धूर झाला. हे सुरक्षेचे धिंडवडे संपूर्ण जगाने पाहिले. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश महाशक्ती होत असल्याचे रोज सांगितले जाते, पण संसदेस महाशक्तीची मजबूत सुरक्षा व्यवस्था असताना ती भेदून 2 तरुण आत घुसतात व प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारून हाहाकार घडवतात, हे कसले लक्षण?" असा सवाल 'सामना'च्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे.

तरुणांच्या हातात एके-47 असायला हवी होती काय?

"मोदी व त्यांचे संपूर्ण सरकार गेल्या 2 महिन्यांपासून 5 राज्यांतील विधानसभा निवडणूक प्रचारात दंग होते. निवडणुकांचे निकाल आल्यावर राजा व त्याचे मंडळ विजयाच्या उत्सवात मग्न झाले. नंतर मुख्यमंत्र्यांच्या नेमणुका व शपथ ग्रहणाच्या राजकीय उत्सवातील रंगात न्हाऊन निघाले असताना 4 बेरोजगार तरुणांनी संसदेत घुसून सरकारची बेअब्रू केली. हे तरुण ‘भारतमाता की जय’, ‘संविधान बचाव’, ‘बेरोजगारांना न्याय द्या’, अशा घोषणा देत होते. लोकसभेचे अध्यक्ष श्री. बिर्ला म्हणतात, ‘‘सनसनाटी निर्माण करून प्रसिद्धी मिळविण्याचा हा प्रकार आहे. फार गांभीर्याने घेऊ नका.’’ बिर्लाजी, या तरुणांच्या हाती फक्त धुराची नळकांडी होती म्हणून बरे! 2001 प्रमाणे बॉम्ब, एके-47 असायला हवी होती काय? तरच तुम्हाला गांभीर्याने घ्यावे असा हा प्रकार वाटला असता काय?" अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाने संसदेच्या अध्यक्षांच्या भूमिकेवरुन त्यांना लक्ष्य केलं आहे.

रामलल्लाचे मोफत दर्शन घडवून वैफल्य दूर होणार नाही

"ते 5 तरुण या देशाचे नागरिक आहेत. त्यात एक तरुणी नीलम हरयाणातील आहे. महाराष्ट्रातील लातूरचा अमोल शिंदे आहे. महागाई, बेरोजगारीने मेटाकुटीस येऊन त्यांनी हा मार्ग स्वीकारला. मोदी यांनी वर्षाला 2 कोटी रोजगार देण्याची ‘गॅरंटी’ दिली होती. त्या गॅरंटीची अंमलबजावणी झाली असती तर अमोल शिंदेवर असे टोकाचे आंदोलन करण्याची वेळ आली नसती. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची मोदी गॅरंटी अमलात आणली असती तर हरयाणाच्या उच्चशिक्षित नीलम आझादला संसदेबाहेर ‘राडा’ करण्याची दुर्बुद्धी सुचली नसती. देशभरातील तरुणांत वैफल्य आहे व बेरोजगारांना रामलल्लाचे मोफत दर्शन घडवून हे वैफल्य दूर होणार नाही," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

पास देणारा खासदार मुसलमान असता तर..

"महाराष्ट्रात गेल्या 4 महिन्यांत 3 हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता अमोल शिंदेसारख्या तरुणानेही एक प्रकारे आत्मघातच केला. कारण सरकारने त्याला अतिरेकी ठरवून दहशतवादविरोधी कलमांखाली अटक केली. त्यामुळे आजन्म तुरुंगात राहणे चौघांच्या नशिबी आले. मोदींचे सरकार व त्यांचा पक्ष निवडणूकग्रस्त असल्याचा परिणाम देश भोगत आहे. आता प्रश्न येतो नव्या संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचा. हजारो सुरक्षाकर्मी, शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे, स्कॅनर्स, अंगाची झडती घेणारी यंत्रणा असताना धुराच्या नळकांड्या घेऊन 2 तरुण आत शिरले. या दोघांनाही आत जाण्याचे ‘पास’ मिळाले ते भाजप खासदाराच्या शिफारसीने. त्यामुळे संपूर्ण भाजपच्या तोंडास याप्रकरणी टाळे लागले आहे. हाच खासदार विरोधी पक्षाचा असता व त्यातही मुसलमान असता तर भाजपने देशात एव्हाना ‘हिंदू खतरे में’ व ‘देश खतरे में’च्या डरकाळ्या फोडत 2024 च्या प्रचाराचा नारळ फोडून घेतला असता," अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

हल्ल्यामागेही पंडित नेहरू व काँग्रेसचे धोरण?

"5 तरुणांतील कोणी मुसलमान असता तर ‘मोदी-शहां’ना मारण्याच्या इस्लामी राष्ट्रांच्या कटाचा शंख फुंकून देशातील माहौल गरम केला असता, पण ‘पास’ देणारा भाजपचा खासदार व घुसखोर हिंदू असल्याने कार्यक्रमास रंगत चढली नाही. देशाचे वातावरणही असे विचित्र वळणावर उभे आहे. देश सुरक्षित असल्याच्या वल्गना फोल ठरल्या आहेत. चीन लडाखच्या भूमीवर आत घुसला आहे, पाकडे अतिरेकी कश्मीरात घुसून जवानांचे रक्त सांडत आहेत, मणिपुरातील हिंसाचारात चीन व म्यानमारचा हात आहे आणि आता संसदेत बिनचेहऱ्याचे 5 ‘भारतीय’ तरुण घुसले. सर्व काही ‘राम भरोसे’ चालले आहे. भारतीय जनता पक्ष व त्याच्या सुरक्षाविषयक धोरणांची पोलखोलच झाली आहे. 2 तरुण धुराची नळकांडी घेऊन संसदेत व सभागृहात घुसले आणि दोघांनी संसदेबाहेर हल्लाबोल केला. आता या हल्ल्यामागेही पंडित नेहरू व काँग्रेसचे धोरण कारणीभूत आहे काय? कालच्या हल्ल्यास नेहरूच जबाबदार आहेत हे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन एकदा जाहीर करून टाकावे," असा उपहासात्मक टोला ठाकरे गटाने लागवला आहे.

देशाच्या सुरक्षेशी, संसदेच्या प्रतिष्ठेशी खेळायला नको

"देशाच्या सर्वोच्च सुरक्षा व्यवस्थेला भेदणाऱ्या संसदेवरील ‘स्मोक’ हल्ल्याची आता चौकशी सुरू आहे. या चौकशीची जबाबदारी ‘ईडी’, ‘इन्कम टॅक्स’च्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे काय? गृहमंत्री महोदय, देशाच्या सुरक्षेचा, संविधान, कायदा-सुव्यवस्था असा सगळ्याचाच खेळखंडोबा झाला आहे. 3 राज्यांच्या विजयात राजा मग्न आहे, पण प्रजा बेरोजगारी, महागाईने तळमळत आहे. खासदारांच्या सभागृहात विद्रोही तरुणांनी भावनेचा स्फोट घडवला. त्यांचा मार्ग चुकला. देशाच्या सुरक्षेशी, संसदेच्या प्रतिष्ठेशी त्यांनी खेळायला नको होते," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

Read More