Marathi News> भारत
Advertisement

झारखंड विधानसभेत राष्ट्रवादीचा प्रवेश, हा उमेदवार विजयी

झारखंडमध्ये राष्ट्रवादीच्या एकमेव उमेदवाराला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. 

झारखंड विधानसभेत राष्ट्रवादीचा प्रवेश, हा उमेदवार विजयी

मुंबई : महाराष्ट्रानंतर झारखंडमध्ये भाजपला सत्तेतून पाय उतार व्हावे लागले आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्त्वातील काँग्रेस-राजद आघाडीने बाजी मारत भाजपला सत्तेतून खाली खेचत आपल्याकडे सत्ता खेचून आणली आहे. काँग्रेस-झामुमो यांच्या निवडणूकपूर्व आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. असे असले तरी सध्या राष्ट्रवादीच्या एकमेव उमेदवाराला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही एक उमेदवार विजयी झाला आहे.

fallbacks

दरम्यान, काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीसाठी एक आनंदाची बातमी आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळाची जादू चालली आहे. राष्ट्रवादीचे नेते कमलेश कुमार तिवारी हे हुसैनबाद विधानसभा मतदारसंघातून आघाडी होते. त्यांनी १० हजार मतांची आघाडी घेतली होती. त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. ते विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रीय जनता दलाचे संजय कुमार सिंग यादव, आपचे कन्हैया विश्वकर्मा तसेच बसपाचा उमेदवार होता. या मतदारसंघातून १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. मात्र, राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बाजी मारत आपला विजय साकार केला आहे. त्यामुळे झारखंड विधानसभेत राष्ट्रवादीने प्रवेश केला आहे. याची माहिती खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ते म्हणालेत, आमचा एक उमेदवार जिंकला आहे.

झारखंड निवडणुकीचे निकाल पाहता देशातील जनता भाजपविरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रातली सत्तेची ताकद आणि आर्थिक ताकद वापरूनही भाजपच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारलं. त्याबद्दल मी झारखंडच्या जनतेचे धन्यवाद देतो. झारखंडसह, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या पाच राज्यातून भाजप हद्दपार झाली आहे. यामुळे देशातील इतर राज्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे. सरळ दिसत आहे की भाजपाला उतरती कळा लागली आहे व आता ही उतरण थांबू शकणार नाही, असे पवार म्हणालेत. 

सुधारित नागरिकत्व कायद्याचा प्रभाव झारखंड निवडणुकांमध्ये दिसतोय. देशात CAA किंवा NRC सारखे कायदे आणण्याची आवश्यकता नव्हती. या मुद्द्यांवरून समाजात आणि देशात धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न होतोय. पंतप्रधान म्हणाले की CAA व NRC या विषयांवर मंत्रिमंडळात फारशी चर्चा झाली नाही. मात्र गृहमंत्री स्पष्ट म्हणाले होते की NRC आणणार. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातही याचा उल्लेख होता. यानंतरही चर्चा झाली नसल्याचे पंतप्रधान म्हणतात, त्यामुळे ते जे सांगतात आणि वस्तुस्थिती यात तफावत आहे, असे पवार म्हणालेत.

fallbacks

Read More