Marathi News> भारत
Advertisement

कुत्र्याच्या भुंकण्यावरून दोघांची हत्या; प्रशासनाने आरोपीच्या घरावर फिरवला बुलडोझर

Dewas Firing Case: मध्य प्रदेशातील देवासमध्ये कुत्र्याच्या भुंकण्यावरून झालेल्या वादातून दोघांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी झालेल्या या घटनेत एक जण जखमीही झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.

कुत्र्याच्या भुंकण्यावरून दोघांची हत्या; प्रशासनाने आरोपीच्या घरावर फिरवला बुलडोझर

Madhya Pradesh Dewas Firing Case: मध्य प्रदेशातील (MP Crime) देवासमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुत्र्याच्या भुंकणाच्या वादातून रविवारी सकाळी दोघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. देवास येथील सटवास परिसरात पाळीव कुत्रा भुंकल्याने दोन कुटुंबे  समोरासमोर आली होती. वाद इतका वाढला की थेट गोळीबार (Firing) झाला. या गोळीबारात दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. देवासचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनजीत सिंह यांनी सांगितले की, इंदौरपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या सटवास परिसरात कुत्रा भुंकल्याने गोदरा आणि देदार कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. या वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले आणि त्यातच गोळीबार झाला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

राजेश गोदरा हे रविवारी सकाळी आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन फिरायला गेले होते. घरी परतत असताना देदार कुटुंबातील एका सदस्याला पाहून कुत्रा भुंकायला लागला. यावरून दोन्ही कुटुंबात वाद सुरू झाला. याच वादातून गोदरा कुटुंबातील तिघांना गोळ्या लागल्या. या हल्ल्यात अनिल गोदारा यांचे वडील कैलास गोदरा आणि चुलत भाऊ राजेशचे वडील नारायण गोदारा यांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. तर सुनील गोदरांच्या पायाला गोळी लागली.

वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनजीत सिंह यांनी सांगितले की, "गोदरा आणि देदार कुटुंबात जुना वाद होता. 'राजेश गोदरा रविवारी सकाळी त्याच्या पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन गेले होते. ते घरी परतत असताना कुत्रा देदार कुटुंबातील सदस्यावर भुंकायला लागला. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली. प्रकरण इतके पुढे गेले की गोदरा कुटुंबातील तिघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राजेशचा जागीच मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. कैलास गोदराचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला, तर तिसऱ्या जखमीला इंदूरला हलवण्यात आले आहे."

या प्रकरणानंतर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सातपैकी दोन आरोपी वरुण आणि राजेश देडद यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. कैलास गोदरा हे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अनिल गोदरा यांचे वडील असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर जवळपासच्या इतर पोलीस ठाण्यांमधूनही फौजफाटा मागवून तैनात करण्यात आले आहे. 

या घटनेमुळे संतप्त झालेल्या मृताच्या नातेवाईकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आंदोलन केले. आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यांच्यावर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून, बुलडोझरने त्यांची घरे पाडेपर्यंत मृतांवर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका गोदरा कुटुंबियांनी घेतली होती. त्यानंतर दुपारी प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरोपींची घरे बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आली.

Read More